ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्ररायगड

“आमदारांचा एक फोन… प्रांताधिकारी बेडवरून ताडकन उठले; ३५० दाखल्यांवर डिजिटल स्वाक्षरी”

"आजारी अवस्थेतही विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीची कार्यवाही; आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्तक्षेपानंतर ३५० प्रलंबित दाखले मार्गी" आमदार आणि प्रांताधिकार्‍यांच्या भूमिकेचे होत आहे सर्व स्तरातून कौतुक


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग |
शैक्षणिक प्रवेशाची अंतिम मुदत जवळ येत असताना विविध दाखल्यांसाठी सुमारे ३५० विद्यार्थी-पालकांची धावपळ सुरू होती. प्रांताधिकारी मुकेश चव्हाण आजारी असल्याने दाखल्यांची प्रक्रिया प्रलंबित होती. ही बाब आमदार महेंद्र दळवी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने प्रांताधिकारी चव्हाण यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला. आमदारांचा फोन येताच प्रांताधिकारी मुकेश चव्हाण बेडवरून ताडकन उठले आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून डिजिटल स्वाक्षरीद्वारे सर्व प्रलंबित दाखल्यांना तत्काळ मंजुरी दिली. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले आणि पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विविध शैक्षणिक प्रवेशांसाठी आवश्यक असलेले सुमारे ३५० दाखले अलिबाग प्रांताधिकारी कार्यालयात प्रलंबित राहिल्याने विद्यार्थी आणि पालक मोठ्या चिंतेत सापडले होते. प्रवेशाची अंतिम मुदत जवळ येत असताना दाखले मिळत नसल्याने अनेकांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली होती.
प्रांताधिकारी मुकेश चव्हाण हे आजारी असल्यामुळे दाखल्यांच्या मंजुरीची प्रक्रिया रखडल्याचे समोर आले. या परिस्थितीची माहिती आमदार महेंद्र दळवी यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने प्रांताधिकारी मुकेश चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. आमदाराचा फोन येताच मुकेश चव्हाण हे बेड वरून ताडकन उठून बसले.
विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, या भूमिकेतून प्रांताधिकारी चव्हाण यांनी प्रकृती अस्वस्थ असतानाही डिजिटल स्वाक्षरीद्वारे सुमारे ३५० प्रलंबित दाखल्यांना मंजुरी दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रवेशासाठी धावपळ करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पालकांचा मनस्तापही टळला.
या घटनेमुळे दोन प्रश्न मात्र उपस्थित झाले आहेत. एका अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीत संपूर्ण व्यवस्था ठप्प का झाली? विद्यार्थ्यांचे भविष्य एका अधिकाऱ्याच्या उपलब्धतेवर अवलंबून राहावे, अशी यंत्रणा का उभी राहिली? आमदारांच्या हस्तक्षेपानंतरच प्रशासनाला गती मिळत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न कोण सोडवणार, असा सवालही उपस्थित होत आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आजारी अवस्थेतही तत्परता दाखविल्याबद्दल प्रांताधिकारी मुकेश चव्हाण आणि प्रश्नाची तातडीने दखल घेतल्याबद्दल आमदार महेंद्र दळवी यांचे अनेक पालकांनी स्वागत केले.
…..

Related Articles

Back to top button