ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

श्रद्धांजलीचा फॉरमॅट बदलतोय? पुष्पहार आणि अभिवादनाऐवजी विचारांच्या व्यासपीठातून मीनाक्षीताईंच्या स्मृतीला उजाळा!

‘जखमी लोकशाहीच्या कपाळावर आशेचे कुंकू...’पासून रायगडच्या विकासापर्यंत; ५० तरुणांच्या आवाजातून शेकापच्या पारंपरिक राजकीय भाषेला नव्या पिढीच्या आवाजाची जोड देण्याचा प्रयत्न


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
अलिबाग |
दिवंगत नेत्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुष्पहार, अभिवादन आणि श्रद्धांजलीचे पारंपरिक कार्यक्रम होत असताना, मिनाक्षीताई पाटील यांच्या स्मृतीला मात्र विचारांच्या व्यासपीठातून अभिवादन करण्याची परंपरा सलग दुसऱ्या वर्षीही कायम ठेवण्यात आली आहे. पुष्पहार आणि अभिवादनापुरती स्मृती मर्यादित न ठेवता नव्या पिढीला विचारांचे व्यासपीठ देत सामाजिक, राजकीय आणि लोकशाहीविषयक प्रश्नांवर त्यांचा आवाज बुलंद करण्याचा हा उपक्रम आहे.
शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी विद्यार्थी संघटना, पुरोगामी युवक संघटना आणि सांस्कृतिक आघाडीच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता शेतकरी भवन, अलिबाग येथे रायगड जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत पहिल्या येणाऱ्या ५० स्पर्धकांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
यंदाच्या स्पर्धेतील विषयही या वैचारिक प्रयोगाची दिशा स्पष्ट करणारे आहेत. ‘जखमी लोकशाहीच्या कपाळावर आशेचे कुंकू लावतीये मी’, ‘कलम जब  जागती तो सत्ता कॉंपीते’, ‘रायगडचा विकास आणि जनतेची अपेक्षा’, ‘आजचा विद्यार्थी आणि उद्याचा भारत’, ‘मजबुती का नाम महात्मा गांधी’ आणि ‘सत्तेच्या सिंहासनावर नव्हे, जनतेच्या हृदयात घर करणारी ताई, मीनाक्षीताई’ अशा विषयांवर स्पर्धक आपले विचार मांडणार आहेत.
त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी होणारी ही स्पर्धा केवळ वक्तृत्वाची स्पर्धा न राहता मिनाक्षीताईंच्या वैचारिक वारशाचा नव्या पिढीशी संवाद साधण्याचा प्रयत्न ठरत आहे. विशेषतः विद्यार्थी आणि युवकांना प्रत्यक्ष व्यासपीठ देऊन सत्ता, लोकशाही, विकास, गांधी विचार आणि सामाजिक प्रश्नांवर त्यांची भूमिका मांडण्याची संधी मिळत आहे.
यातून शेकापच्या पारंपरिक राजकीय विचारविश्वाला नव्या पिढीच्या भाषेची आणि नव्या आवाजाची जोड देण्याचा प्रयत्न होत असल्याचे या उपक्रमाच्या स्वरूपावरून दिसून येते. मात्र यंदा या व्यासपीठावरून तरुण वक्ते मीनाक्षीताईंच्या कार्याकडे कसे पाहतात आणि आजच्या प्रश्नांशी त्यांच्या विचारांचा संबंध कसा जोडतात, हे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी १५ हजार १ रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकासाठी ११ हजार १ रुपये, तृतीय क्रमांकासाठी ७ हजार १ रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी ५ हजार १ रुपये आणि पाचव्या क्रमांकासाठी ३ हजार १ रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय उत्तेजनार्थ पाच पारितोषिकेही ठेवण्यात आली आहेत.
म्हणजेच सलग दुसऱ्या वर्षी मिनाक्षीताईंच्या स्मृतीला हार-फुलांऐवजी शब्दांची आदरांजली मिळणार आहे. आता या ५० तरुणांच्या आवाजातून त्या स्मृतीला कोणती नवी वैचारिक भाषा मिळते, याकडे रायगडचे लक्ष लागले आहे.
……

Related Articles

Back to top button