क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

रायगडच्या तरुण वादळांची पुण्यात धडक! आरव बरळ व देव सिंगच्या शतकांवर रायगडचा एक डाव व १५७ धावांनी थाटात विजय


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

पुणे :  येथील सी.पी. मैदानावर चौदा वर्षांखालील आंतरजिल्हा निवड चाचणी स्पर्धेत रायगडच्या छोट्या रणवीरांनी अक्षरशः वादळ उठवले. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात रायगडच्या आरव बरळ आणि देव सिंग या जोडीने प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजीचा चक्काचूर केला.

सलामीवीर आरव बरळने २१ चौकार आणि २ षटकारांसह खेळलेल्या १५५ धावांच्या तुफानी खेळीने रायगडचा पाया भक्कम केला. त्याचवेळी मधल्या फळीत उतरलेला अष्टपैलू देव सिंगने १६ चौकारांसह १०२ धावा काढत आरवला उत्तम साथ दिली. दोघांच्या जोडीने उभा केलेला मोठा धावांचा डोंगर पाहून रायगडच्या बाकावर जल्लोष उसळला.

रायगडने ८ गडी गमावून ३३० धावांवर डाव घोषित केला. प्रत्युत्तरात दक्षिण विभागाचा संघ रायगडच्या वेगवान व फिरकी माऱ्यांसमोर टिकूच शकला नाही. पहिल्या डावात फक्त ११३ धावांवर गारद झाल्यानंतर फॉलो-ऑन घेतलेल्या दक्षिण विभागाचा दुसराही डाव केवळ ६० धावांवर आटोपला.

गोलंदाजीत देव सिंगने पुन्हा चमक दाखवत ५ बळी, तर विराज थोरातने ३ आणि अर्शद अलीने २ बळी घेतले. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर दमदार प्रदर्शन करत रायगडने हा सामना एक डाव व १५७ धावांनी जिंकत स्पर्धेला भक्कम सुरुवात केली.

आरवचा प्रशिक्षक नयन कट्टा व स्वप्नील कदम आणि देव सिंगचा प्रशिक्षक सागर कांबळे यांनी आपल्या शिष्यांच्या खेळावर अभिमान व्यक्त केला. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशननेही सर्व खेळाडूंचे अभिनंदन करत पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.


Related Articles

Back to top button