क्रिकेटच्या निकालापेक्षा आता निर्णय देणाऱ्यांचीही ताकद वाढली!; रायगडने उभी केली पंचांची ‘बेंच स्ट्रेंथ’, तीन वर्षांत १८ एमसीए-प्रमाणित पंच

सत्यमेव जयते नन्यूज डॉट कॉम
अलिबाग |
रायगडमध्ये क्रिकेटची गुणवत्ता वाढविण्याच्या प्रयत्नांना आता मैदानावरील खेळाडूंसोबतच सामन्याचे निर्णय घेणाऱ्या पंचांचीही मजबूत फळी लाभत आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वतीने आयोजित अंतिम पंच परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चार पंच या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत रायगड जिल्ह्यात तयार झालेल्या एमसीए-प्रमाणित पंचांची संख्या आता १८ वर पोहोचली आहे.

रायगड-उरणचे सुरेश म्हात्रे आणि रविंद्र म्हात्रे, अलिबागचे अभिजित वाडकर तसेच रसायनीचे निशांत माळी यांनी एमसीए-प्रमाणित पंच होण्याचा मान मिळविला आहे. अंतिम परीक्षेतील या यशामुळे रायगडच्या क्रिकेटला केवळ खेळाडूंची नव्हे, तर अधिकृत आणि प्रशिक्षित पंचांचीही सक्षम ‘बेंच स्ट्रेंथ’ मिळत असल्याचे चित्र आहे.
क्रिकेटचा दर्जा उंचावण्यासाठी केवळ उत्तम खेळाडू तयार होणे पुरेसे नसते; सामन्याचे नियम, तांत्रिक बारकावे आणि निष्पक्ष निर्णयांची अंमलबजावणी करणारी सक्षम पंचांची फळीही तितकीच महत्त्वाची असते. ही गरज लक्षात घेऊन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने जिल्ह्यातील पंचांसाठी सातत्याने प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात आहेत. त्यामुळे पंचांच्या प्रशिक्षणाला संस्थात्मक स्वरूप मिळत असून, त्याचा परिणाम एमसीएच्या परीक्षेतील यशातून दिसून येत आहे.
ही प्रशिक्षण शिबिरे ऑनलाइन तसेच प्रत्यक्ष कार्यशाळांच्या माध्यमातून घेण्यात आली. एमसीएच्या पंच परीक्षेची पूर्वतयारी करताना या प्रशिक्षणाचा पंचांना मोठा फायदा झाला. सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि परीक्षेची शिस्तबद्ध तयारी यामुळे रायगडमध्ये गेल्या तीन वर्षांत तब्बल १८ एमसीए-प्रमाणित पंच तयार झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील क्रिकेट सामन्यांसाठी प्रशिक्षित पंचांची उपलब्धता वाढण्याबरोबरच भविष्यात उच्चस्तरीय सामन्यांसाठी पंच घडविण्याची पायाभरणीही होत आहे.
या प्रशिक्षण उपक्रमात क्रिकेट नियमांचे तज्ज्ञ आणि मुख्य प्रशिक्षक व मार्गदर्शक नयन कट्टा, माजी रणजीपटू तथा विद्यमान बीसीसीआय पंच हर्षद रावले, रुपेश खडगी तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पंच राजन कसबे यांनी मोलाचे योगदान दिले. नियमांचा सखोल अभ्यास, मैदानावरील परिस्थितीचे आकलन आणि पंच म्हणून निर्णय घेण्याची अचूकता यासाठी या मार्गदर्शनाचा पंचांना मोठा लाभ झाला.
एमसीएच्या अंतिम पंच परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सुरेश म्हात्रे, रविंद्र म्हात्रे, अभिजित वाडकर आणि निशांत माळी यांचे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदीप नाईक यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




