ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड
पर्यटनातून थेट एव्हिएशनकडे; ‘बीच टू बोर्डिंग पास’मधून रायगडच्या तरुणांची अवकाश झेप
पीएनपी एज्युकेशन सोसायटी आणि आयईएसपी यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबागमध्ये विशेष रोजगार व करिअर मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
किल्ले, समुद्रकिनारे आणि पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यात आता नव्या युगाची चाहूल लागली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये ‘एव्हिएशन संस्कृती’ आकार घेऊ लागली असून, गावागावातील युवक आता विमानतळ आणि हॉस्पिटेलिटी क्षेत्रातील करिअरकडे आकर्षित होत आहेत. अलिबागमध्ये सुरू झालेल्या अत्याधुनिक स्किल ट्रेनिंग सेंटरमुळे ग्रामीण भागातील तरुणांसाठी जागतिक दर्जाच्या रोजगाराच्या नव्या संधी खुल्या झाल्या आहेत.
पीएनपी एज्युकेशन सोसायटी आणि आयईएसपी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात विशेष रोजगार आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रातील प्रशिक्षण देणाऱ्या अत्याधुनिक स्किल ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी आयईएसपी संस्थेचे प्रमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गॅरी खन्ना यांनी युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, देशात विमानतळ आणि एअरलाईन्स उद्योग झपाट्याने विस्तारत असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे रायगडचे महत्त्व आणखी वाढणार आहे. येत्या काळात हजारो रोजगार निर्माण होणार असून स्थानिक युवकांनी कौशल्याधारित प्रशिक्षण घेऊन या संधीसाठी तयार राहणे आवश्यक आहे.
“पूर्वी एअरपोर्ट करिअर ही मोठ्या शहरांपुरती मर्यादित संकल्पना होती; मात्र आता रायगडच्या गावागावातील युवकही केबिन क्रू, एअरपोर्ट ऑपरेशन आणि हॉस्पिटेलिटीसारख्या क्षेत्रात करिअर घडवण्याचे स्वप्न पाहू लागले आहेत. योग्य प्रशिक्षण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ग्रामीण भागातील युवक देशभरात आपली ओळख निर्माण करू शकतात,” असेही त्यांनी नमूद केले.

शेकाप महिला राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी स्थानिक युवकांच्या रोजगाराचा मुद्दा ठामपणे मांडताना सांगितले की, “गावातील मुलांना नोकरीसाठी मोठ्या शहरांत भटकंती करावी लागू नये, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शिक्षणासोबत कौशल्य विकास महत्त्वाचा असून, ग्रामीण युवकांना थेट उद्योग आणि सेवा क्षेत्राशी जोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.”
या प्रशिक्षण केंद्रात एअर होस्टेस, केबिन क्रू, एअरपोर्ट ऑपरेशन व मॅनेजमेंट, हॉस्पिटेलिटी, ग्राहक सेवा, हेल्थकेअर सपोर्ट, कॉर्पोरेट ट्रेनिंग, कम्युनिकेशन स्किल्स, ग्रूमिंग आणि व्यक्तिमत्त्व विकास यांसारखे विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना प्लेसमेंट सहाय्यही देण्यात येणार आहे.
अलिबाग, मुरुड, रोहा आणि रायगडच्या ग्रामीण भागातील युवकांसाठी हे केंद्र करिअरची नवी दिशा ठरणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. “रायगड आता फक्त पर्यटन जिल्हा राहिलेला नाही; तर भविष्यात ‘स्काय करिअर हब’ म्हणूनही ओळख निर्माण करू शकतो,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाला अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, पीएनपी ग्रुपचे प्रमुख उद्योजक नृपाल पाटील, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, पाणीपुरवठा सभापती अनिल चोपडा, प्रदीप नाईक, माजी जि.प. सदस्य द्वारकानाथ नाईक, राष्ट्रवादीचे ॲड. प्रवीण ठाकूर, काका ठाकूर, सुरेश घरत, अनिल पाटील, ॲड. के.डी. पाटील, अंजली पाटील, अंकित बंगेरा, नंदकुमार मयेकर, हर्षदा मयेकर, रश्मी पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, पालक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…..
गावातला तरुण आता विमानतळाच्या करिअरकडे
रायगडच्या खेड्यांत आता ‘एव्हिएशन ड्रीम्स’ची हवा पोहोचू लागली आहे. एअर होस्टेस, केबिन क्रू, एअरपोर्ट मॅनेजमेंटसारखी करिअर पूर्वी फक्त महानगरांतील युवकांपुरती मर्यादित मानली जात होती. मात्र, अलिबागमध्ये सुरू झालेल्या प्रशिक्षण केंद्रामुळे ग्रामीण भागातील युवक-युवतींनाही जागतिक दर्जाच्या सेवा क्षेत्रात करिअर घडवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
…..
युवकांसाठी उपलब्ध अभ्यासक्रम
एअर होस्टेस प्रशिक्षण
केबिन क्रू
एअरपोर्ट ऑपरेशन व मॅनेजमेंट
हॉस्पिटेलिटी आणि ग्राहक सेवा
हेल्थकेअर सपोर्ट
कम्युनिकेशन स्किल्स
व्यक्तिमत्त्व विकास आणि ग्रूमिंग
कॉर्पोरेट ट्रेनिंग
प्लेसमेंट सहाय्य
…..
शनिवार अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. पीएनपी एज्युकेशन सोसायटी आणि आयईएसपी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.१७) गोंधळपाडा-वेश्वी येथील पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयात अत्याधुनिक स्किल ट्रेनिंग सेंटरची प्रत्यक्ष सुरूवात होत आहे. या ठिकाणी विमानतळ क्षेत्रातील रोजगार संधींबाबत सविस्तर माहिती, करिअर मार्गदर्शन, कौन्सिलिंग, मुलाखती आणि प्राथमिक निवड प्रक्रिया आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.




