ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

शहराच्या नेतृत्वापासून बॉक्सिंग रिंगपर्यंत; घरत आळीच्या व्यासपीठावर अक्षया नाईक आणि सिद्धी पाटील यांच्या कर्तृत्वाचा गौरव!

तरुणाईच्या कर्तृत्वाला व्यासपीठ; सार्वजनिक जीवन आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची ‘आदर्श’ मित्र मंडळाकडून दखल


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग |

एकीकडे शहराच्या विकासाची धुरा सांभाळणारे तरुण नेतृत्व, तर दुसरीकडे बॉक्सिंग रिंगमध्ये आपल्या कौशल्याच्या जोरावर विजय मिळविणारी युवा क्रीडापटू… कर्तृत्वाची ही दोन वेगळी रूपे गुरुवारी घरत आळीतील गणेशोत्सवाच्या व्यासपीठावर एकत्र आली.

घरत आळी, अलिबाग येथील आदर्श मित्र मंडळाच्यावतीने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील सर्वात तरुण नगराध्यक्षा अक्षया नमिता प्रशांत नाईक आणि सी.बी.एस.ई. दक्षिण विभागीय बॉक्सिंग स्पर्धा २०२६ मध्ये प्रथम क्रमांक पटकावणारी सिद्धी अपर्णा केतन पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अक्षया नाईक यांनी अलिबाग नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत शहराच्या सार्वजनिक जीवनात तरुण नेतृत्वाचा ठसा उमटविला आहे. नगराध्यक्ष म्हणून शहरातील विकासकामे, नागरिकांशी संवाद आणि विविध नागरी प्रश्नांवर काम करताना तरुणाईच्या नेतृत्वक्षमतेला व्यासपीठ मिळू शकते, हा संदेश त्यांच्या कार्यातून पुढे येत आहे. याच पार्श्वभूमीवर आदर्श मित्र मंडळाने त्यांच्या नेतृत्वाचा गौरव करत सत्कार केला.

दुसरीकडे सिद्धी पाटील हिने क्रीडा क्षेत्रात अलिबागचे नाव उज्ज्वल केले आहे. कोल्हापूर येथे झालेल्या सी.बी.एस.ई. दक्षिण विभागीय बॉक्सिंग स्पर्धा २०२६ मध्ये तिने प्रथम क्रमांक मिळवत विजेतेपद पटकावले. पी.एन.पी. कॉलेज, अलिबाग येथे शिक्षण घेणाऱ्या सिद्धीच्या या कामगिरीची दखल घेत गणेशोत्सवाच्या व्यासपीठावर तिचा विशेष सन्मान करण्यात आला.

एकीच्या हातात शहराच्या कारभाराची जबाबदारी, तर दुसरीच्या हातात बॉक्सिंगचे ग्लोव्हज, अशा या दोन वेगळ्या वाटा असल्या तरी दोघींच्या यशामागे जिद्द, मेहनत आणि स्वतःला सिद्ध करण्याची वृत्ती समान आहे. त्यामुळेच या दोघींचा एकाच कार्यक्रमात झालेला गौरव हा केवळ सत्कार न राहता तरुणाईसमोर कर्तृत्वाच्या दोन दिशा अधोरेखित करणारा ठरला.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच परिसरातील गुणवंत, कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी व्यक्तींचा गौरव करण्याची परंपरा जपण्याचा प्रयत्न आदर्श मित्र मंडळाने केला. राजकारणातील नेतृत्व असो किंवा क्रीडा क्षेत्रातील संघर्ष, यशासाठी सातत्य आणि जिद्द आवश्यक असते, हा संदेश या सत्कारातून अधोरेखित झाला.

या वेळी अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा वीज व बांधकाम समितीचे सभापती प्रशांत नाईक, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती अश्विनी ठोसर, नगरसेविका निवेदिता वाघमारे, नगरसेवक आनंद पाटील यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
घरत आळी येथे झालेल्या या कार्यक्रमात तरुण नेतृत्व आणि युवा क्रीडा कर्तृत्वाचा एकाच व्यासपीठावर झालेला सन्मान हा विशेष आकर्षण ठरला.
…..


Related Articles

Back to top button