ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

“निसर्गोपचार म्हणजे जंगलात जाणं नव्हे… तर स्वतःकडे परत येणं!”


दैनंदिन धावपळ, मोबाईलचा अतिरेक आणि सततच्या मानसिक ताणामुळे माणूस आज शरीरापासून आणि मनापासून दूर जात आहे. या पार्श्वभूमीवर सारळा, अलिबाग येथील मानसशास्त्रीय निसर्गसमूपदेशक मिलिंद अनंत पाटील यांनी निसर्गोपचार या संकल्पनेकडे केवळ उपचार म्हणून नव्हे, तर जीवनशैली म्हणून पाहण्याचा आग्रह धरला आहे. त्यांच्या अनुभवातून आणि निरीक्षणातून साकारलेली ही लेखमालिका विनोद, वास्तव आणि आत्मपरीक्षण यांचा सुंदर संगम आहे. नेचरोपॅथी म्हणजे जंगलात जाऊन राहणं नाही, तर आधुनिक जीवन जगत असतानाही निसर्गाशी नातं पुन्हा जोडण्याची साधी, पण परिणामकारक वाट या लेखांमधून उलगडली आहे.

——————————————————
भाग १ – नेचरोपॅथी (निसर्गोपचार)
नमस्कार मंडळी,
“नैसर्गिक राहा” असं म्हटलं की लोकांच्या चेहऱ्यावर जी भावना उमटते ना, ती पाहून वाटतं—यांना वाटतं की निसर्गोपचार म्हणजे जंगलात जाऊनच झोपलं पाहिजे!
नेचरोपॅथी म्हणजे काय?
मोफत उपचार! कुठलंही बिल नाही! आणि सगळ्यात भारी म्हणजे काही चूक झाली तरी डॉक्टर आपल्यावर ओरडत नाहीत—कारण डॉक्टर असतात सूर्य, हवा आणि पाणी!
आपला आजचा प्रॉब्लेम काय?
आपण “नेचर” नाही, आपण फक्त नेचर वॉलपेपर वापरतो!
फोनच्या स्क्रीनवर झाडं, पण घरात प्लास्टिकची फुलं!
डेस्कटॉपवर धबधबा, पण दिवसभरात पाणी पिणं 800 MB डेटासारखं कमी!
नेचरोपॅथी सांगते—“पाणी प्या!”
आणि आपण म्हणतो—
“पाणी फ्रेश दिसतंय… पण कोल्ड ड्रिंक हवं होतं, पाण्याला चव नाही!”
अहो, शरीरात 70% पाणी आहे. म्हणून माणूस बिघडला की थोडा द्रवपदार्थ दिला की तो सावरतो.
कधी एखादा माणूस चिडलेला दिसला, तर त्याला विचारून बघा—
“पाणी प्यायलं का?”
९०% वेळा उत्तर येईल—
“अरे नाही, विसरलो!”
बस्स…
निसर्ग म्हणतो—
“हा तुझा आजार नाही, हा तुझा डिहायड्रेशन अ‍ॅटिट्यूड आहे!”
नेचरोपॅथीचे नियम अगदी सोपे आहेत.
पोटात गरम/कोमट पाणी
अंगावर सूर्यप्रकाश
पायाखाली गवत
ताटात कच्चं काहीतरी (नॉनव्हेज सोडून बरं का!)
आणि आरशासमोर स्वतःलाच पसंत करा
बस्स…
शरीर खुश होऊन म्हणतं—
“वा! आज मालकानं माझ्याकडेही बघितलं!”
निसर्गोपचार म्हणजे शरीराची फॅक्टरी रिसेट प्रक्रिया.
औषधांवर अवलंबून न राहता निसर्गाकडे वळलात की शरीर म्हणतं—
“अरे वा! हेच तर माझं ओरिजिनल सेटिंग होतं!”
नेचरोपॅथी शरीर स्वच्छ करते.
– मिलिंद अनंत पाटील, सारळ, अलिबाग
“मानसशास्त्रीय निसर्ग समुपदेशक”
📞 9404791798

Related Articles

Back to top button