रायगडच्या मातीतील आशिष भट यांच्याकडे महाराष्ट्राच्या ‘पोर्ट-लॉजिस्टिक्स’ विकासाची जबाबदारी
महाराष्ट्र चेंबरच्या बंदरे, लॉजिस्टिक्स आणि वेअरहाउसिंग समितीच्या सह-अध्यक्षपदी नियुक्ती; वाढवण-दिघी बंदरांमुळे कोकणातील रोजगाराला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचा पुढील टप्पा बंदरे, लॉजिस्टिक्स आणि वेअरहाउसिंगच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीचा असणार आहे. याच पार्श्वभूमीवर रायगडच्या मातीतील आशिष भट यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या बंदरे, लॉजिस्टिक्स आणि वेअरहाउसिंग समितीच्या सह-अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच २०२६-२०२८ या कालावधीसाठी कार्यकारी मंडळाचे पदसिद्ध सदस्य म्हणूनही त्यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी ६ ऑक्टोबर २०२६ रोजी भट यांना नियुक्तीचे अधिकृत पत्र दिले. याप्रसंगी निमंत्रित जी.सी. सदस्य सचिन माहेश्वरी यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. रायगडच्या भूमीतील व्यक्तीला राज्यातील बंदरे आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने या नियुक्तीकडे केवळ पद म्हणून नव्हे, तर रायगड आणि संपूर्ण कोकणातील रोजगारनिर्मितीच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
रायगड आणि कोकणाच्या औद्योगिक भवितव्याच्या दृष्टीने वाढवण आणि दिघी बंदरांचे महत्त्व आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या बंदरांमुळे प्रत्यक्ष रोजगाराबरोबरच वाहतूक, लॉजिस्टिक्स, वेअरहाउसिंग, जहाजसेवा, दुरुस्ती, पॅकेजिंग, पुरवठा साखळी, हॉटेल व्यवसाय, सेवा उद्योग आणि अन्य पूरक व्यवसायांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात.
बंदर उभे राहणे म्हणजे केवळ पायाभूत सुविधा उभारणे नव्हे, तर त्या बंदराभोवती उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराची संपूर्ण परिसंस्था उभी राहणे होय. या संधींचा सर्वाधिक फायदा रायगड आणि संपूर्ण कोकणातील तरुणांना मिळाला पाहिजे, हा दृष्टिकोन आशिष भट यांच्या नव्या जबाबदारीतून पुढे येण्याची अपेक्षा आहे.
विशेषतः रायगडमध्ये मोठ्या औद्योगिक प्रकल्पांसोबतच स्थानिक तरुणांना रोजगार, स्थानिक उद्योजकांना व्यवसायाच्या संधी आणि छोट्या-मोठ्या उद्योगांना बंदरांच्या अर्थव्यवस्थेशी जोडण्याचे मॉडेल विकसित करण्याची गरज आहे. या दृष्टीने भट यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

महाराष्ट्र चेंबरचे यंदाचे शताब्दी वर्ष असल्याने संस्थेच्या वाटचालीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. व्यापार आणि उद्योगाचा विस्तार केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित न ठेवता ‘गाव तेथे उद्योजक’ ही संकल्पना पुढे नेण्याच्या दिशेने चेंबरचे काम सुरू असल्याचे आशिष भट यांनी स्पष्ट केले.
याच विचारातून ग्रामीण भागातील तरुणांना उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. पोर्ट्स आणि लॉजिस्टिक्ससारख्या वेगाने विस्तारत असलेल्या क्षेत्राशी ग्रामीण आणि स्थानिक उद्योजकांना जोडता आले, तर कोकणातील रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळू शकते, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र चेंबरची स्थापना १९२७ मध्ये पद्मभूषण शेट वालचंद हिराचंद यांच्या प्रेरणेतून झाली. व्यापार, उद्योग आणि कृषी क्षेत्रातील उद्योजकांना जोडणाऱ्या या संस्थेच्या विविध विषय समित्यांमार्फत राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात.
राज्याच्या धोरणनिर्मितीत रायगडचा आवाज
बंदरे, लॉजिस्टिक्स आणि वेअरहाउसिंग हे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र बनत आहे. वाढवण, दिघी, जेएनपीटी परिसर आणि रायगडमधील औद्योगिक पट्टा या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील धोरणात्मक प्रश्नांना राज्यस्तरीय व्यासपीठ मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आशिष भट यांच्या अनुभवाचा उपयोग रायगडसह संपूर्ण कोकणातील तरुणांना रोजगाराच्या संधी, स्थानिक उद्योजकांना व्यवसायाच्या संधी आणि बंदराभोवती निर्माण होणाऱ्या अर्थव्यवस्थेत स्थानिक सहभाग वाढविण्यासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
“बंदर आले, उद्योग आले; आता त्यातून रोजगार आणि उद्योजकता गावागावात पोहोचली पाहिजे. ‘गाव तेथे उद्योजक’ या संकल्पनेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देणे हेच पुढील काळातील महत्त्वाचे उद्दिष्ट असले पाहिजे,” असे आशिष भट यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे महाराष्ट्र चेंबरच्या शताब्दी वर्षात रायगडच्या मातीतील आशिष भट यांना मिळालेली ही जबाबदारी केवळ एका पदाची नियुक्ती नसून, वाढवण-दिघीच्या माध्यमातून कोकणाच्या बदलत्या औद्योगिक नकाशावर स्थानिक रोजगार आणि उद्योजकतेचा ठसा उमटविण्याची मोठी संधी म्हणून पाहिली जात आहे.
……




