ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

चिमुकल्यांपासून ज्येष्ठांपर्यंत; अलिबागच्या आरोग्याच्या ‘Life Cycle’ची  काळजी!

अलिबाग नगर परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न, बालकांच्या आरोग्यासाठी २५० पालकांचा सहभाग; ३७ ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
अलिबाग |
शहराच्या आरोग्याचा विचार केवळ आजारपणानंतरच्या उपचारांपुरता मर्यादित न ठेवता, चिमुकल्यांच्या आरोग्याची पायाभरणी करण्यापासून ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत संपूर्ण ‘Life Cycle’चा विचार अलिबाग नगरपरिषदेने पुढे आणला आहे. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातर्फे आज विविध प्रभागांमध्ये घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरांमध्ये शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांसाठी २५० पालकांनी आपल्या मुलांना तपासणीसाठी आणले, तर ज्येष्ठ नागरिकांच्या शिबिरात ३७ ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
अलिबाग नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष अॅड. मानसी म्हात्रे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. बालपणातील आरोग्याची मजबूत सुरुवात आणि ज्येष्ठत्वातील आरोग्याची संवेदनशील काळजी, या दोन्ही टोकांना एका आरोग्य उपक्रमात जोडण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला.
बालकांसाठी ब्राह्मण आळी येथील यूएचडब्ल्यूसी, शास्त्रीनगर येथील यूएचडब्ल्यूसी तसेच कन्या शाळेसमोरील यूएचडब्ल्यूसी येथे आरोग्य शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये डॉ. विनायक पाटील, डॉ. सागर खेदू, डॉ. राजेंद्र चांदोरकर  डॉ. मैत्रयी तिवारी, डॉ. सरोदे, आणि डॉ. मनोज कोळी यांनी वैद्यकीय सेवा दिली.
ज्येष्ठ नागरिकांसाठी अलिबाग येथील ज्येष्ठ नागरिक भवनात मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ३७ ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. डॉ. अपूर्वा पाटील, डॉ. मंजिरी इंगळे, डॉ. श्रेयस नाईक, डॉ. वैभव चौलकर आणि डॉ. सचिन जायभाय यांनी ज्येष्ठ नागरिकांची तपासणी केली.
“अलिबागकरांचे आरोग्य सुदृढ आणि चांगले राहिले पाहिजे,” या उद्देशाने आरोग्यविषयक उपक्रमांना प्राधान्य दिले जात असल्याचे अॅड. मानसी म्हात्रे यांनी सांगितले. आरोग्य शिबिरांसोबतच शहर स्वच्छ आणि रोगराईमुक्त ठेवण्यासाठी दर शनिवारी एका प्रभागात स्वच्छता अभियान राबविण्याचा संकल्पही नगरपरिषदेने केला आहे.
अलिबाग हे पर्यटकांचे आवडते ठिकाण असल्याने शहराची स्वच्छता आणि सुसज्जता महत्त्वाची आहेच; मात्र सुंदर अलिबागसोबत निरोगी अलिबाग घडविणेही तितकेच आवश्यक आहे, असे अॅड. म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
आरोग्य आणि स्वच्छता या दोन्ही बाबींना नागरिकांच्या जीवनमानाशी जोडत ‘निरोगी नागरिक–स्वच्छ शहर–सुसज्ज अलिबाग’ या दिशेने नगरपरिषदेचा प्रयत्न सुरू असल्याचे या उपक्रमातून दिसून आले.
नगरसेविका शैला भगत,स्वीकृत नगरसेवक  जमाल सय्यद,आरोग्य विभाग प्रमुख प्रियांका मोरे, नगर अभियंता संतोष मुंढे, स्वच्छता निरीक्षक  धनंजय आंब्रे, शहर समन्वयक आर्या जाधव, मुकादम प्रकाश तांबे, अक्षय गायकवाड तसेच संपूर्ण आरोग्य विभाग व अलिबाग नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे, मेडिकल डिस्ट्रिब्युटर असोसिएशनच्यावतीने आवश्यक औषधांचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे तपासणीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बालकांना व ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यात आली. या सहकार्यामुळे शिबिराचा लाभ नागरिकांना अधिक प्रभावीपणे मिळाला.
……
“शहराचा विकास मोजताना केवळ पायाभूत सुविधांची उंची पाहून चालत नाही; त्या शहरातील नागरिकांच्या जीवनमानाची गुणवत्ता हा विकासाचा खरा मापदंड असतो. जन्माच्या पहिल्या टप्प्यापासून ज्येष्ठत्वापर्यंत प्रत्येक वयोगटाच्या आरोग्याची काळजी घेणे, ही नगरपरिषदेची केवळ सामाजिक जबाबदारी नाही तर सुदृढ शहरनिर्मितीची मूलभूत गुंतवणूक आहे. ‘सुंदर अलिबाग’सोबत ‘निरोगी अलिबाग’ घडविण्याचा आमचा प्रयत्न केवळ एका उपक्रमापुरता मर्यादित न राहता सातत्यपूर्ण नागरी आरोग्य चळवळीत रूपांतरित व्हावा, हा आमचा संकल्प आहे.”
अॅड. मानसी म्हात्रे, उपनगराध्यक्ष, अलिबाग नगरपरिषद

Related Articles

Back to top button