सहा दिवसांचा उत्सव, एका दिवसात 74 हजार विसर्जने; रायगडच्या जलाशयांवर भक्तीचा ‘महाप्रवाह’!
595 विसर्जनस्थळांवर गणरायाला निरोप; 58 हजार गणेशमूर्तींसह गौराईच्या मूर्तींचेही विसर्जन ढोल-ताशांचा गजर, बेंजोचा ठेका अन् भावुक वातावरणात बाप्पाच्या उत्सवाचा समारोप

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
सहा दिवस घराघरांत भक्तिभावाने विराजमान झालेल्या गणरायाला शनिवारी (दि. 19) रायगड जिल्ह्यात जल्लोषात निरोप देण्यात आला. ढोल-ताशांचा गजर, बेंजोचा ठेका, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात जिल्ह्यातील तलाव, नदी, समुद्र, खाडी आणि कृत्रिम तलाव अक्षरशः भक्तीच्या महाप्रवाहाने गजबजून गेले. जिल्ह्यातील तब्बल 595 विसर्जनस्थळांवर 74 हजार 347 गणेश व गौराईच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
रायगडमध्ये सोमवारी (दि. 14) तब्बल एक लाख पाच हजार 345 गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली होती. दीड दिवसांच्या गणरायाच्या विसर्जनानंतर बुधवारी गौराईचे आगमन झाले. जिल्ह्यात सुमारे 16 हजार गौराईच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करून महिलांनी पारंपरिक पद्धतीने आरती, पूजन आणि विविध नैवेद्य दाखवत सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. सहा दिवस गणरायासह गौराईच्या उपस्थितीने घराघरांत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
या सहा दिवसांत धार्मिक कार्यक्रमांसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भजन, आरती, कीर्तन तसेच विविध उपक्रमांमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणाईने उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामुळे गणेशोत्सव केवळ घरापुरता मर्यादित न राहता सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सवाचे स्वरूप धारण करताना दिसला.

शनिवारी सायंकाळी पाचनंतर विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. अनेक ठिकाणी गणरायाची आणि गौराईची वाहने फुलांनी तसेच आकर्षक रोषणाईने सजविण्यात आली होती. ढोल-ताशे, बेंजो आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर तरुणाईसह आबालवृद्धांनी ठेका धरला. काहींच्या चेहऱ्यावर निरोपाचा आनंद होता, तर बाप्पाला निरोप देताना अनेक भक्तांचे डोळेही पाणावले. त्याचवेळी स्पीकरवरील गाणी आणि वाद्यांच्या तालावर मिरवणुकीत उत्साह कायम होता.
विशेष म्हणजे विसर्जन मिरवणुकीदरम्यान वरुणराजानेही हजेरी लावली. पावसाच्या सरी आणि मिरवणुकांचा उत्साह यांचा अनोखा संगम अनेक ठिकाणी पाहायला मिळाला. ग्रामीण भागात काही ठिकाणी सायंकाळी सातच्या सुमारास नदी व तलावांमध्ये मूर्तींचे विसर्जन करण्यात आले, तर काही ठिकाणी रात्री दहा वाजेपर्यंत आणि त्यानंतर समुद्र, खाडी व तलावांमध्ये विसर्जन सुरू होते.
दरम्यान, विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अलिबाग नगरपरिषदेने समुद्रकिनारी विसर्जनासाठी विशेष तयारी केली होती. कृत्रिम तलाव, मदत कक्ष आणि निर्माल्य कक्ष उभारण्यासोबतच समुद्र आणि तलावांमध्ये सुरक्षित विसर्जनासाठी जीव रक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती.
जिल्ह्यातील 595 विसर्जनस्थळांवर भक्तांची मोठी गर्दी झाली होती. एकाच दिवशी हजारो मिरवणुका आणि 74 हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन होत असताना रायगडमध्ये भक्ती, उत्साह, शिस्त आणि भावनिक निरोप यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. सहा दिवसांचा मुक्काम संपवत गणरायाने निरोप घेतला; मात्र ‘पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करत भक्तांनी पुढील गणेशोत्सवाची प्रतीक्षा सुरू केली.
……




