ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

आरबीआयच्या नजरेत ‘रायगड मॉडेल’; ८,००० कोटींच्या व्यवसायासह रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामाचे कौतुक

२० हजारांहून अधिक महिला बचतगटांना पाठबळ; ग्रामीण वित्तीय समावेशन, सहकारी संस्थांचे डिजिटायझेशन आणि आधुनिक बँकिंगचा आरबीआयकडून विशेष गौरव


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

अलिबाग |

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजाची थेट भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून, ग्रामीण वित्तीय समावेशन, सहकारी संस्थांचे सक्षमीकरण आणि आधुनिक बँकिंग व्यवस्थेच्या क्षेत्रातील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे काम सहकार क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरू शकते, असे गौरवोद्गार आरबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काढले.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुख्य कार्यालयातील डिपार्टमेंट ऑफ रेग्युलेशनचे जनरल मॅनेजर विकासकुमार साहू, असिस्टंट जनरल मॅनेजर धनंजय भासे आणि शैलेश इंगळे यांच्या शिष्टमंडळाने अलिबाग येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयाला भेट देत बँकेच्या कामकाजाचा सविस्तर अभ्यास केला. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी बँकेच्या वाटचालीचे सविस्तर सादरीकरण केले. नाबार्ड महाराष्ट्र रिजनल ऑफिसचे एजीएम नवल कन्नोर आणि आरडीसी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यावेळी उपस्थित होते.

रायगड जिल्हा बँकेने आठ हजार कोटींहून अधिक व्यवसायाचा टप्पा गाठताना सातत्यपूर्ण व्यवसायवृद्धीसोबतच आधुनिक बँकिंग सेवा, डिजिटल परिवर्तन, रिस्क मॅनेजमेंट, सायबर सुरक्षा आणि ग्राहकाभिमुख सेवा यामध्ये केलेल्या कामाचा यावेळी आढावा घेण्यात आला.
बदलत्या बँकिंग व्यवस्थेशी सुसंगतपणे बँकेने आपल्या कार्यपद्धतीत सातत्याने सुधारणा करण्याचा घेतलेला दृष्टिकोन प्रशंसनीय असल्याचे विकासकुमार साहू यांनी नमूद केले.

वित्तीय समावेशनाच्या क्षेत्रात बँकेने केलेल्या कार्याची यावेळी विशेष दखल घेण्यात आली. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) यांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे ग्रामीण उद्योजकता, स्वयंरोजगार आणि सूक्ष्म उद्योगांना बँकेने दिलेले पाठबळ उल्लेखनीय असल्याचे साहू यांनी सांगितले.

विशेषतः २० हजारांहून अधिक महिला बचतगटांना बँकेने दिलेले आर्थिक पाठबळ हे ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि महिला आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारे महत्त्वाचे काम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

रायगड जिल्हा बँकेने केवळ शहरी आणि निमशहरी भागावर लक्ष केंद्रित न करता कशेळे, मजगाव, नाते, विन्हेरे, विळे, राजपुरी, संदेरी यांसारख्या ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये शाखांचा विस्तार करून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचविण्याचे काम केले आहे.
ग्रामीण भागातील विविध घटकांना औपचारिक बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याचा हा प्रयत्न वित्तीय समावेशनाचा प्रभावी नमुना असल्याचे आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले.

सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी रायगड जिल्हा बँकेने राबविलेल्या विविध उपक्रमांचाही यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला. सहकारी संस्थांचे संगणकीकरण करून त्यांना आधुनिक बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी बँकेने घेतलेला पुढाकार सहकार क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे साहू यांनी सांगितले. सहकारी संस्थांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी उभारलेली ही व्यवस्था देशातील इतर सहकारी संस्थांसाठी मार्गदर्शक ठरू शकते, असेही त्यांनी मत व्यक्त केले.

यावेळी बोलताना विकासकुमार साहू म्हणाले की, सहकार क्षेत्रातील बँकांनी केवळ व्यवसायवृद्धीवर लक्ष केंद्रित न करता वित्तीय समावेशन, संस्थात्मक सक्षमीकरण आणि गुणवत्तापूर्ण बँकिंग सेवा यांवर सातत्याने भर देणे आवश्यक आहे.

रायगड बँकेने या सर्व क्षेत्रांमध्ये केलेले प्रयत्न उल्लेखनीय असून, बदलत्या बँकिंग व्यवस्थेशी सुसंगतपणे स्वतःमध्ये सातत्याने सुधारणा करण्याचा बँकेचा दृष्टिकोन निश्चितच प्रशंसनीय आहे.

या यशामागे बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांचे विकासाभिमुख नेतृत्व, संचालक मंडळ आणि व्यवस्थापनाची दूरदृष्टी तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचेही विकासकुमार साहू यांनी गौरवाने नमूद केले.

बँकेने आतापर्यंत उभारलेल्या सक्षम व्यवस्थेमुळे रायगड जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला आर्थिक बळ मिळण्यासोबतच ग्रामीण भागातील नागरिक, महिला बचतगट, उद्योजक आणि सहकारी संस्था यांना औपचारिक आर्थिक व्यवस्थेशी जोडण्यास मोठी मदत झाली आहे.

आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा ॲनालिटिक्स, डिजिटल गव्हर्नन्स, अधिक सक्षम सायबर सुरक्षा आणि आधुनिक बँकिंग तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ग्राहकांना अधिक सुरक्षित, जलद आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा बँकेचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

रायगड जिल्हा बँकेने सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी केलेले कार्य देशातील सहकार क्षेत्रासाठी ‘रोल मॉडेल’ ठरू शकते, असे मत व्यक्त करत विकासकुमार साहू यांनी बँकेचे अभिनंदन केले.

आठ हजार कोटींहून अधिक व्यवसाय, २० हजारांहून अधिक महिला बचतगटांना आर्थिक पाठबळ, दुर्गम ग्रामीण भागापर्यंत बँकिंग सेवा आणि सहकारी संस्थांचे डिजिटायझेशन या चार प्रमुख आधारस्तंभांवर रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने उभारलेली कार्यपद्धती आता केवळ जिल्ह्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. आरबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अभ्यासदौऱ्यामुळे ‘रायगड मॉडेल’ला राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित करणारी महत्त्वपूर्ण ओळख प्राप्त करणारी ठरल्याचे बोलले जाते.
…..


Related Articles

Back to top button