ताज्या बातम्यारायगड
11,931 MT युरिया मंजूर, 9,848 MT वाटप पूर्ण – रायगडात खत पुरवठा सुरळीत

रायगड : जिल्ह्यात 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या खरीप हंगामासाठी 11,931 मेट्रिक टन युरिया खताचे आवंटन मंजूर झाले आहे. त्यापैकी 1 एप्रिलपासून आतापर्यंत 9,150 मेट्रिक टन युरिया खताचा आणि बफर स्टॉकमधून 698 मेट्रिक टन असा एकूण 9,848 मेट्रिक टन खताचा पुरवठा झाला आहे. 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीतच आरसीएफ कंपनीमार्फत 790 मेट्रिक टन युरियाचा पुरवठा करण्यात आला आहे. उर्वरित युरियाचा पुरवठा देखील नियमितपणे केला जाणार असल्याची माहिती कृषी विभाग व आरसीएफ प्रतिनिधींनी दिली आहे.
रायगड जिल्ह्यात भात हे खरीप हंगामातील मुख्य पीक असून सद्यस्थितीत भात लागवड पूर्णत्वास आली आहे. आता पीक वाढीच्या टप्प्यात असून खतांची विशेष गरज आहे. काही दिवसांपूर्वी पेन, अलिबाग, उरण व पनवेल तालुक्यांतील शेतकऱ्यांमध्ये युरिया खताच्या तुटवड्याबाबत चिंता होती. मात्र, आता याबाबत काळजी करण्याची गरज नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी केंद्र धारकांकडूनच खत खरेदी करावी, ती देखील शासनाने निश्चित केलेल्या दरानेच करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच खत खरेदीचे पक्के बिल/पावती घ्यावी आणि कोणतीही गैरप्रकार आढळल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
कृषी केंद्र धारकांसाठी महत्त्वाच्या सूचना:
विक्री केंद्रावर सर्व उत्पादने व अधिकृत दर स्पष्टपणे फलकावर प्रदर्शित करावेत.
प्रत्येक शेतकऱ्याला पक्के बिल देणे बंधनकारक आहे.
दररोजचा साठा नोंद नियमितपणे ठेवावा.
फक्त अधिकृत कंपन्यांची व सरकारमान्य उत्पादनेच विक्रीस ठेवावीत.
नकली किंवा कालबाह्य उत्पादने विक्रीस ठेवू नयेत.
खतांची विक्री ई-पॉस मशीनद्वारेच करणे आवश्यक आहे.
वरील सर्व नियमांचे पालन न केल्यास संबंधित केंद्र धारकांविरोधात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी स्पष्ट सूचना कृषी विभागाने दिली आहे.