ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

स्वातंत्र्यदिनी घोषणेपाठोपाठ अक्षया नाईक ॲक्शन मोडमध्ये; COTPA अंमलबजावणीसाठी नगरपरिषदेत महत्त्वाची बैठक संपन्न

टपरी, पानटपरी, हॉटेल्सपासून शाळा-रुग्णालयांपर्यंत ‘नो स्मोकिंग’ मोहीम; पर्यटकांनाही COTPAच्या कक्षेत आणण्याची तयारी


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग |

स्वातंत्र्यदिनी ‘व्यसनमुक्त अलिबाग’ची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाला आळा घालण्यासाठी आणि सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम अर्थात COTPA कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेत आज महत्त्वाची बैठक पार पडली. यामुळे १५ ऑगस्टला केलेल्या घोषणेला आता प्रत्यक्ष कृतीची जोड मिळाली आहे.

अलिबाग हे पर्यटन शहर असल्याने स्थानिक नागरिकांसोबत पर्यटकांमध्येही तंबाखूविरोधी जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे. शहरातील चहाच्या टपऱ्या, पानटपऱ्या, हॉटेल्स, बसस्थानके तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी ‘नो स्मोकिंग’चे फलक व जनजागृती पोस्टर्स लावण्यात येणार आहेत. संबंधित आस्थापनांना COTPA कायद्यातील तरतुदींची माहिती देऊन नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

१५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत विशेष जनजागृती व अंमलबजावणी मोहीम राबविण्याच्या दिशेने नगरपरिषदेने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे ‘व्यसनमुक्त अलिबाग’ ही केवळ घोषणाच न राहता शहरातील सार्वजनिक ठिकाणांपर्यंत पोहोचणारी मोहीम बनविण्याचा प्रयत्न आहे.

आजच्या बैठकीत हॉटेल व्यावसायिक आणि पानटपरीधारकांना या मोहिमेत सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी केले. ‘नो स्मोकिंग’ जनजागृतीसाठी संबंधित आस्थापनांनी आवश्यक सूचना फलक लावावेत आणि COTPA कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. तर मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी सुरुवातीच्या टप्प्यात जनजागृतीवर विशेष भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. नागरिक, व्यावसायिक आणि संबंधित सर्व घटकांनी मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन करत जनजागृतीनंतरही नियमांचे उल्लंघन सुरू राहिल्यास COTPA कायद्याची कठोर अंमलबजावणी करून कारवाई केली जाईल, असा इशारा साळुंखे यांनी दिला.

शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्येही धूम्रपानमुक्त परिसरासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विविध संस्थांकडून धूम्रपानमुक्त परिसराचे घोषणापत्र घेण्यासोबतच विद्यार्थी आणि युवकांमध्ये जनजागृती करण्यासाठी रॅली, पथनाट्य, जनसंवाद आणि सामूहिक प्रतिज्ञा यांसारखे उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी नगरपरिषदेसोबत जिल्हा रुग्णालय, समाजकल्याण विभाग, जिल्हाधिकारी सैनिक कार्यालय, महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्था, शैक्षणिक संस्था तसेच हॉटेल आणि पानटपरी व्यावसायिकांचा सहभाग राहणार आहे. विशेषतः सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान रोखणे आणि नागरिकांसह पर्यटकांना नियमांची माहिती देणे, यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यात येणार आहे.

बैठकीला नगराध्यक्षा अक्षया नाईक, मुख्याधिकारी सागर साळुंखे, नगरसेवक अनिल चोपडा, नीलम हजारे, साक्षी पाटील, प्रदीप नाईक, जमालुद्दीन सय्यद, ऋषिकेश माळी, आनंद पाटील, अश्विनी ठोसर आणि योजना पाटील उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयाचे विकास पवार, सुशील साईकर, समाजकल्याण विभागाचे अनिल बोरीकर, जिल्हा सैनिक कार्यालयाचे शेख अब्दुल मजीद, महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्थेचे अनिल गुंजे तसेच अलिबाग नगरपरिषद व खासगी शाळांचे मुख्याध्यापक, हॉटेल व्यावसायिक आणि पानटपरीधारक उपस्थित होते.
……


Related Articles

Back to top button