क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
रील्सच्या युगात ‘नारळ फोडी’तून मातीच्या संस्कृतीचा जागर
रामनाथ गावदेवी मंदिर परिसरात पारंपरिक खेळाला उत्स्फूर्त प्रतिसाद; नव्या पिढीला लोकपरंपरेशी जोडण्याचा प्रयत्न

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
मोबाईल, सोशल मीडिया आणि रील्सच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक खेळ मागे पडत असताना, अलिबाग तालुक्यातील रामनाथ येथे नारळ फोडीच्या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक संस्कृती आणि लोकपरंपरेचा जागर घडविण्यात आला, असे अलिबाग नगर परिषदेचे नगरसेवक एडवोकेट अंकित बंगेरा यांनी स्पष्ट केले. श्री रामनाथ गावदेवी मंदिराच्या प्रांगणात झालेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांसह तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भाजपा रामनाथ विभागप्रमुख अजिंक्य शेवडे, शगीर शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या वेळी नगरसेवक ॲड. अंकित बंगेरा यांनी उपस्थित राहून खेळात सहभाग घेतला.
यावेळी बोलताना ॲड. बंगेरा म्हणाले, “डिजिटल मनोरंजनाच्या युगात आपल्या मातीतील खेळ आणि परंपरा जिवंत ठेवणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख होते.”

स्पर्धेला आमदार प्रमोद जठार यांनीही उपस्थिती लावत नारळ फोडीच्या खेळात सहभाग घेतला. त्यांच्यासमवेत खेळण्याचा अनुभव आनंददायी व अविस्मरणीय ठरल्याची भावना ॲड. बंगेरा यांनी व्यक्त केली.
यावेळी नगरसेविका संध्या पालवणकर, भाजपा महिला प्रमुख पल्लवी जोशी, शहर सचिव मानस कुंटे, निखिल चव्हाण, सुनील दामले, अशोक वारगे, आदित्य जैन, मयुरेश जोशी, श्री गाडे, पुनीत शेठ, रोशन भगत यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. स्थानिक खेळांना प्रोत्साहन देत नव्या पिढीला संस्कृतीशी जोडण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.




