ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

“रिकाम्या हातात फाईल नाही, आता नियुक्तीपत्र; सरकारी शिक्क्यासह 13 जणांची स्वप्नपूर्ती, नोकरीत एंट्री होताच लाईफ सेट!” 

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान, अनेक दिवसांच्या प्रतीक्षेला  मिळाला पूर्णविराम  


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
अलिबाग |
रायगड जिल्ह्यात सोमवारी (ता.30) असा उत्साहपूर्ण माहोल पाहायला मिळाला. सरळ सेवा भरती 2023-24 अंतर्गत आरोग्य सेवक (पुरुष) 40 टक्के आणि 50 टक्के संवर्गातील अतिरिक्त अंतिम निवड यादीतून एकूण 13 उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर उपस्थित होत्या.
नियुक्ती आदेश मिळताच अनेक दिवसांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आणि उमेदवारांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद ओसंडून वाहताना दिसला. 40 टक्के संवर्गातून वैभव डोंगरे (मजगाव-माणगाव), श्रीकृष्णा वाईकर (हमरापूर-पेण), विनय कदम व प्रशांत दुधमल (वेळास-श्रीवर्धन), सागर वेहेळे (चौक-खालापूर), अनंता वायाळ (निजामपूर-महाड) आणि अजयसिंह सावंत भोसले (दासगाव-महाड) यांची नियुक्ती करण्यात आली. तर 50 टक्के संवर्गातून साकिब पटेल (आचळोली-महाड), किरण किर्तने (मोठे शहापूर-अलिबाग), जगदिश सुलाने (खारआंबोली-मुरूड), प्रकाश शिंदे (मांघरुण-महाड), अमोल जाधव (नेवरुळ-म्हसळा) आणि राजेंद्र जोनवाल (वेळास-श्रीवर्धन) यांना संधी मिळाली.
या नियुक्तीपत्र वितरण सोहळ्यात उपाध्यक्ष मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या भरतीमुळे केवळ 13 तरुणांचे आयुष्य मार्गी लागले नसून रायगडच्या ग्रामीण आरोग्य व्यवस्थेलाही नवे बळ मिळणार आहे. आता हे नवोदित आरोग्यसेवक दुर्गम भागात सेवा देत आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत.
दरम्यान, या नियुक्त्यांमुळे रायगड जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून, दुर्गम भागात आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे. नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी ही संधी केवळ रोजगाराची नाही, तर समाजसेवेची जबाबदारीही घेऊन आली आहे. आता “लाईफ सेट” झालेल्या या 13 आरोग्यसेवकांकडून जनतेला अधिक चांगली आणि तत्पर आरोग्यसेवा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Back to top button