क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

रायगड क्रिकेटची ‘टॅलेंट बँक’ उभारण्यासाठी आरडीसीएचा टॅलेंट हंट; २५० युवा खेळाडूंची चाचणी

अक्षय दरेकरांसह तज्ज्ञ निवडकर्त्यांकडून गुणवंत क्रिकेटपटूंचा शोध; निवडलेल्या खेळाडूंना प्रशिक्षण शिबिराची संधी


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
अलिबाग  | 
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (आरडीसीए) तर्फे पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर शनिवारी (२३ मे) आयोजित करण्यात आलेल्या १४ वर्षांखालील मुलांच्या टॅलेंट हंट उपक्रमातून जिल्ह्याच्या भविष्यातील क्रिकेट संघासाठी गुणवंत खेळाडू शोधण्याची मोहीम राबविण्यात आली. माजी इंडिया ‘ए’ खेळाडू तथा महाराष्ट्र रणजी संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष अक्षय दरेकर यांच्यासह अनुभवी रणजीपटू, प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या निवड चाचणीत रायगड जिल्ह्यातील विविध भागांतील सुमारे २५० युवा क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला.
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये दडलेल्या क्रिकेट प्रतिभेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक स्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना जिल्हास्तरीय आणि त्यानंतर राज्यस्तरीय संघ व प्रशिक्षण शिबिरांपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे. त्याचबरोबर आगामी काळात रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा संघ अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक बनविण्यासाठी गुणवंत खेळाडूंची ‘टॅलेंट बँक’ तयार करण्यावरही भर देण्यात आला आहे.
टॅलेंट हंटदरम्यान खेळाडूंच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि एकूणच खेळ कौशल्याचे बारकाईने निरीक्षण करून त्यांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी माजी रणजीपटू पुष्कराज चव्हाण, योगेश पवार, माल्कम माँटेरो, रायगड संघाचे मुख्य प्रशिक्षक शंकर दळवी, एमसीए पंच व राज्यस्तरीय खेळाडू सागर मुळे हे प्रमुख निवडकर्ते म्हणून कार्यरत होते. त्यांना हृषिकेश राऊत, संदीप जोशी, सागर कांबळे, मिहीर भाटकर, अभिजित रोहंदिया, विनय पाटील, रोहित कार्ले आणि सुनील सरगर यांनी सहकार्य केले.
या उपक्रमातून निवड झालेल्या खेळाडूंसाठी विशेष प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि अधिकाधिक सामन्यांच्या माध्यमातून स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील कौशल्य विकसित करण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शनही मिळणार आहे.
या वेळी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सदस्य अरुण शिंदे, देवेंद्र पाटील, ॲड. पंकज पंडित, प्रदीप खलाटे, नरेंद्र मयेकर, भूषण मोरे, मनोहर अहिर यांच्यासह मोठ्या संख्येने खेळाडू आणि पालक उपस्थित होते. आरडीसीएच्या या उपक्रमामुळे रायगड जिल्ह्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना मोठे व्यासपीठ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
……

Related Articles

Back to top button