ताज्या बातम्यामुंबईरायगड

रायगडमध्ये भाषा-गणित गुणवत्ता वाढ मोहिमेला वेग; 170 शिक्षकांना आधुनिक व डिजिटल अध्यापनाचे प्रशिक्षण


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

अलिबाग  |

रायगड जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी जिल्ह्यात आधुनिक अध्यापन पद्धती व डिजिटल शिक्षणावर भर देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रथम फाउंडेशनच्या सहकार्याने सोमवारी (ता.१६) अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी हॉल येथे जिल्ह्यातील केंद्रप्रमुख, शिक्षक, गटशिक्षण अधिकारी व विस्तार अधिकारी यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले, उपशिक्षणाधिकारी सुनील भोपळे, उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे, विस्तार अधिकारी कल्पना काकडे, निपुण महाराष्ट्र जिल्हा समन्वयक क्षमा खेडेकर, जिल्हा समन्वयक निनाद नागले, प्रथम फाउंडेशनचे राज्य कार्यक्रम प्रमुख शंकर पौळ यांच्यासह एकूण 170 शिक्षक व केंद्रप्रमुख उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांमध्ये भाषा व गणित विषयाच्या परीक्षेचा प्रगती आलेख यावेळी सादर करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षकांना आधुनिक अध्यापन तंत्र, डिजिटल साधनांचा वापर आणि विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

ग्रामीण शाळांमध्ये भाषा-गणित पायाभूत कौशल्ये मजबूत करण्यासोबतच डिजिटल शाळा संकल्पना, पायाभूत सुविधा व नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
ओपन लिंक फाउंडेशन (विनोबा) चे समन्वयक वैभव शिर्के यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच शिष्यवृत्ती सराव परीक्षा व गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल 11 शाळा, ‘पोस्ट ऑफ द मंथ’ ठरलेल्या 7 शिक्षक व 3 केंद्रप्रमुखांचा मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


Related Articles

Back to top button