ताज्या बातम्यादेश विदेशमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईरायगड

रस्त्यावरून रॉकीपर्यंत! सिल्वेस्टर स्टॅलोन संघर्ष, जिद्द, मैत्री आणि पुनरागमनाची कहाणी


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम / डिजिटल रिसर्च टीम 

न्यूयॉर्कमध्ये १९४६ साली जन्मलेल्या सिल्वेस्टर स्टॅलोन यांच्या आयुष्याची सुरुवातच संघर्षाने झाली. जन्मावेळी झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांच्या चेहऱ्याचा उजवा भाग काही प्रमाणात पक्षाघातग्रस्त झाला, त्यामुळे त्यांचा आवाज आणि उच्चार वेगळा राहिला. लहानपणी आई-वडिलांचा घटस्फोट, अपूर्ण शिक्षण आणि तीव्र आर्थिक संकट या अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले. लग्नानंतरही परिस्थिती सुधारली नाही; उपासमारीची वेळ आली, पत्नीचे दागिने विकावे लागले आणि काही काळ ते न्यूयॉर्कमधील बसस्थानकावर आपल्या पाळीव कुत्र्यासह उपाशीपोटी झोपत होते. अत्यंत कठीण प्रसंगी त्यांनी आपला लाडका कुत्रा केवळ २५ डॉलरमध्ये विकला. याच दरम्यान टीव्हीवर महान बॉक्सर मुहम्मद अली यांची लढत पाहून ते प्रेरित झाले आणि सलग ७२ तासांत त्यांनी ‘रॉकी’ची पटकथा लिहिली. जवळपास १०० निर्मात्यांनी नकार दिल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. मोठी रक्कम देण्याची ऑफर असूनही “नायक मीच असेन” या अटीवर ते ठाम राहिले आणि अखेरीस केवळ ३५ हजार डॉलर मानधन व काही टक्के भागीदारीवर चित्रपट साकारला. ‘रॉकी’ने जगभरात यश मिळवत त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली. पुढे ‘फर्स्ट  ब्लड’मधील रॅम्बोच्या भूमिकेतून त्यांनी अ‍ॅक्शन हिरो म्हणून नवी ओळख निर्माण केली.

१९८० च्या दशकात त्यांची आणि अरनॉल्ड  स्चवार्झेनेगजर यांची जबरदस्त स्पर्धा होती; मात्र कालांतराने ही स्पर्धा घट्ट मैत्रीत बदलली. दोघांनी ‘द एक्सपेंडेबल्स आणि ‘इस्केप प्लॅन ’मध्ये एकत्र काम करत चाहत्यांना आनंद दिला. १९९०–२००० च्या काळात काही चित्रपट अपयशी ठरल्याने त्यांचा काळ संपल्याच्या चर्चा सुरू झाल्या; तरीही २००६ मध्ये ‘रॉकी बाल्बोआ’द्वारे त्यांनी दमदार पुनरागमन केले. पहिल्या मानधनातून त्यांनी विकलेला कुत्रा मोठी रक्कम देऊन परत विकत घेतला, अशी माहिती चरित्रांमध्ये नमूद आहे.

अ‍ॅक्शन स्टार म्हणून ओळख असली तरी Sylvester Stallone यांनी सामाजिक क्षेत्रातही योगदान दिले आहे. अमेरिकेतील माजी सैनिकांच्या (Veterans) कल्याणासाठी निधी संकलन कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. काही स्वयंसेवी संस्थांना आर्थिक मदत देत त्यांनी लष्करी जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना पाठिंबा दर्शवला.

याशिवाय बालकल्याण, आरोग्यविषयक उपक्रम आणि कर्करोग संशोधनासाठी काम करणाऱ्या संस्थांना त्यांनी देणग्या दिल्याचे विविध अहवालांमध्ये नमूद आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतकार्यांसाठी निधी उभारण्यामध्येही त्यांनी सहभाग घेतला आहे.

स्टॅलोन यांचा संदेश स्पष्ट आहे यश मिळाल्यानंतर समाजाला परत देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. संघर्षातून उभे राहिलेल्या या कलाकाराने केवळ पडद्यावरच नव्हे, तर प्रत्यक्ष आयुष्यातही संवेदनशीलतेची भूमिका निभावली आहे.

स्टॅलोन यांची ही जीवनकहाणी स्पष्ट संदेश देते स्वप्नांवर विश्वास ठेवा, स्वतःच्या क्षमतेवर ठाम रहा, स्पर्धेला सकारात्मकतेत बदला आणि कोणत्याही संकटासमोर हार मानू नका.


Related Articles

Back to top button