ताज्या बातम्याक्रीडादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

प्रॅक्टिकलमध्ये ‘परफेक्ट २०’! रायगडची साची बेलोसे ठरली कोकणातील पहिली एमसीए स्टेट पॅनल महिला पंच 


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
क्रीडा प्रतिनिधी  
रायगड : जिल्ह्याच्या क्रिकेट इतिहासात आज सुवर्णक्षण कोरला गेला आहे! खारघर येथील  साची सुधीर बेलोसे हिने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित स्टेट पॅनल पंच परीक्षेत प्रॅक्टिकल विभागात २० पैकी २० गुण मिळवत ‘परफेक्ट २०’ कामगिरी केली आहे. या यशामुळे ती रायगडच नव्हे तर संपूर्ण कोकण विभागातील पहिली महिला पंच ठरली आहे!
एमसीएने जाहीर केलेल्या निकालानुसार साची बेलोसे हिला एकूण ८२ टक्के गुण मिळाले असून, प्रॅक्टिकल परीक्षेत तिने राज्यभरात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही कामगिरी केवळ वैयक्तिक यश नाही, तर रायगड आणि कोकण क्रिकेटच्या इतिहासात अभिमानास्पद नवा अध्याय लिहिला गेला आहे.
महिला क्रिकेटपटूपासून पंचपदी प्रवास!
साची बेलोसे ही स्वतः एक कुशल क्रिकेटपटू असून तिने रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या १५, १९, २३ आणि वरिष्ठ महिला संघात स्थान मिळवले आहे. पंच परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर साचीने सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉमला सांगितले की, “महिलांसाठी स्टेट पॅनल पंच परीक्षेचे आयोजन करून एमसीएने महिलांना क्रिकेट क्षेत्रात नवी ओळख दिली आहे. आरडीसीएच्या प्रशिक्षणामुळेच हे यश शक्य झाले,” असे ती म्हणाली.
आरडीसीएच्या प्रयत्नांना फळ
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनने पंचांसाठी तब्बल १०० दिवसांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. या उपक्रमासाठी अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी पुढाकार घेतला. शिबिरादरम्यान नयन कट्टा, बीसीसीआय पंच व माजी रणजी खेळाडू हर्षद रावले, आणि एमसीए (मुंबई) पंच राजन कसबे यांनी पंचांना मार्गदर्शन केले.
आरडीसीए अध्यक्ष अनिरुद्ध पाटील सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम ला म्हणाले, “गेल्या वर्षभरात रायगडातील १२ पंचांनी एमसीए पॅनेलसाठी पात्रता मिळवली असून ११ अधिकृत स्कोअरर्स कार्यरत आहेत. साची बेलोसे हिच्या या यशामुळे रायगड व कोकणातील महिला क्रिकेटला नवा आत्मविश्वास मिळेल.”
रायगड आणि कोकणचा अभिमान
आरडीसीएचे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी साचीचे अभिनंदन केले.
अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, उपाध्यक्ष यशवंत साबळे, सचिव प्रदीप नाईक, सहसचिव जयंत नाईक, कोषाध्यक्ष प्रशांत ओक, उपाध्यक्ष राजेश पाटील आणि संतोष भोईर, सहसचिव बशीर चिचकर
सदस्य ॲड. पंकज पंडित, समीर मसुरकर, प्रदीप खलाटे, कौस्तुभ जोशी आणि मुख्य प्रशिक्षक शंकर दळवी यांनी साचीला शुभेच्छा दिल्या.
कोकण विभागातून एमसीएच्या स्टेट पॅनलवर स्थान मिळवणारी पहिली महिला म्हणून साची बेलोसेने क्रिकेटच्या नव्या युगाची सुरुवात केली आहे. रायगडचा तिरंगा आता कोकणात नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात फडकत आहे!

Related Articles

Back to top button