ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड
डिजिटल सुरक्षितता व जनधन योजनेवर भर – खोपोलीत वित्तीय समावेशन शिबिर संपन्न
“खोपोली येथे रिझर्व्ह बँकेच्या पुढाकाराने आयोजित विशेष वित्तीय समावेशन शिबिरात हजारो नागरिकांचा सहभाग. जनधन योजना, री-केवायसी, डिजिटल सुरक्षितता आणि विविध बँकिंग सुविधांवर मार्गदर्शन.”

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
खोपोली : महाराजा मंगल कार्यालय येथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पुढाकाराने विशेष वित्तीय समावेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एक हजारांहून अधिक नागरिकांनी तत्काळ विविध बँकिंग योजनांचा लाभ घेतला. शिबिरात खाते उघडणी, री-केवायसी प्रक्रिया, प्रधानमंत्री जनधन योजना, मुद्रा कर्ज, सामाजिक सुरक्षा विमा योजना, डिजिटल व्यवहार तसेच डिजिटल फसवणूक प्रतिबंध याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.



या कार्यक्रमाला रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक नीरज निगम, प्रादेशिक संचालक (मुंबई) सुमन रे, बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य महाप्रबंधक दिनकर संकपाळ, बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक सुनील शर्मा, युनियन बँकचे महाप्रबंधक दिलीप मिश्रा, बँक ऑफ बडोदाचे महाप्रबंधक सुनील कुमार शर्मा, सेंट्रल बँकचे रिजनल मॅनेजर विभोर अग्रवाल, बँक ऑफ इंडियाच्या रायगड विभाग प्रमुख दीपन्विता सहानी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे उप महाप्रबंधक दया शंकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

मुख्य पाहुणे नीरज निगम यांनी आपल्या भाषणात वित्तीय समावेशन हा सर्वांगीण आर्थिक विकासाचा पाया असल्याचे सांगितले. प्रत्येक नागरिकाने बँकिंग सेवांशी जोडले गेले पाहिजे तसेच सरकारकडून मिळणाऱ्या थेट लाभांचा फायदा वेळेवर मिळवण्यासाठी खात्यांचे पुनर्जीवन व री-केवायसी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डिजिटल व्यवहार सुरक्षित पद्धतीने करण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. सुनील शर्मा (बँक ऑफ इंडिया) यांनी री-केवायसीचे महत्त्व स्पष्ट केले, तर दिनकर संकपाळ (बँक ऑफ महाराष्ट्र) यांनी जनधन खाते, रुपये कार्ड आणि वारस नोंदणीबाबत मार्गदर्शन केले. सुनील कुमार शर्मा (बँक ऑफ बडोदा) यांनी प्रधानमंत्री सुरक्षा बीमा व जीवन ज्योती बीमा योजनांची माहिती दिली, तर दिलीप मिश्रा (युनियन बँक) यांनी वाढत्या डिजिटल फसवणुकीबाबत नागरिकांना जागरूक केले.
शिबिरात 12 बँकांचे स्टॉल उभारण्यात आले होते. या वेळी प्रास्ताविक डॉ. ज्योती सक्सेना (रिझर्व्ह बँक) यांनी केले, सूत्रसंचालन विशाल गोंदके (रिझर्व्ह बँक रायगड) यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा अग्रणी प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी स्थानिक बँकांचे अधिकारी-कर्मचारी तसेच विक्रम फाउंडेशनचे विक्रम साबळे यांनी विशेष सहकार्य केले. रिझर्व्ह बँकेने आणि जिल्हा ग्रामीण बँकेने त्यांच्या कार्याचे कौतुक केले.




