ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
कौशल्याच्या बळावर महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे : डॉ. साक्षी पाटील
अलिबाग नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे ६० महिलांसाठी १४ दिवसीय ब्युटीपार्लर प्रशिक्षणाचा शुभारंभ

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
“महिलांना केवळ कौशल्य देणे हा उद्देश नाही, तर त्या स्वतःचा व्यवसाय उभारून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, यासाठी अलिबाग नगरपरिषदेने हा प्रशिक्षण उपक्रम हाती घेतला आहे,” असे प्रतिपादन महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती डॉ. साक्षी पाटील यांनी केले.
अलिबाग नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे महिलांसाठी आयोजित १४ दिवसीय ब्युटीपार्लर प्रशिक्षण कार्यक्रमाचा गुरुवारी उत्साहात शुभारंभ झाला. २० ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या या प्रशिक्षणात शहरातील तब्बल ६० महिलांनी सहभाग नोंदविला असून महिलांना कौशल्याच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यावर या उपक्रमाचा भर आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महिलांच्या शिक्षण, स्वाभिमान आणि स्वावलंबनासाठी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याचे स्मरण करत त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

मार्गदर्शन करताना डॉ. साक्षी पाटील यांनी सांगितले की, ब्युटीपार्लर क्षेत्रातील आधुनिक तंत्र, त्वचा व केसांची निगा, मेकअप जलद व योग्य पद्धतीने करण्याच्या पद्धती तसेच व्यावसायिक सेवा यांचे प्रशिक्षण महिलांना दिले जाणार आहे. हे कौशल्य आत्मसात करून प्रत्येक महिलेने स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी आवाहन केले.
उपसभापती ॲड. अश्विनी ठोसर म्हणाल्या, “प्रत्येक महिलेने आत्मविश्वास आणि कौशल्याच्या बळावर स्वतःच्या पायावर उभे राहावे. स्वयंरोजगार हीच खरी आर्थिक स्वातंत्र्याची वाट असून हे प्रशिक्षण त्यासाठी महत्त्वाचे ठरेल.”

कार्यक्रमाचे निवेदन महिला व बालकल्याण विभागाच्या अश्रिता विजय बारसे यांनी केले. प्रशिक्षणाचा उद्देश, महिलांसाठी उपलब्ध होणाऱ्या संधी आणि नवीन कौशल्य आत्मसात करण्याचे महत्त्व त्यांनी प्रभावीपणे मांडले. “आपल्या कर्तृत्वाचे कौतुक करण्यासाठी स्वतःसाठी टाळ्या वाजवा,” या त्यांच्या प्रेरणादायी आवाहनाला उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रशिक्षणासाठी मन्नत मल्टिपर्पज असोसिएशन, पेण या संस्थेची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या अध्यक्षा मुस्कान रफिक झटाम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक सायली शिंदे व वैष्णवी गावंड या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देणार आहेत. संस्थेच्या मॅनेजिंग डायरेक्टर रोहिणी मुंढे यांचीही कार्यक्रमास उपस्थिती होती. मुस्कान झटाम यांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा देत सातत्य आणि गुणवत्तेच्या बळावर महिलांनी यशस्वी उद्योजिका बनावे, असे सांगितले.

कार्यक्रमास नगरसेविका संध्या पालवणकर, योजना पाटील, महिला व बालकल्याण विभाग प्रमुख श्रद्धा नवले, कर व प्रशासकीय अधिकारी प्रियांका वाघ, महिला कर्मचारी वर्ग तसेच प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे आणि मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेला हा उपक्रम महिलांना व्यावसायिक कौशल्य प्राप्त करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी आणि अलिबागमध्ये स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.
……




