ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड
कोरियाचा धडा : कर्ज काढून शेअर बाजारात उडी मारू नका!
एआय, ईटीएफ आणि सट्टेबाजीच्या उन्मादाने दक्षिण कोरियाच्या बाजाराला बसला मोठा धक्का; भारतीय, विशेषतः तरुण गुंतवणूकदारांनी सावध राहण्याची वेळ

अर्थाची सोपी गोष्ट
ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि अर्थविषयांचे गाढे अभ्यासक संजीव चांदोरकर यांच्या लेखणीतून…
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
“आर्टिफिशियल इंटेलिजन्स” ची चर्चा आता नवीन राहिलेली नाही. तुम्ही ज्या क्षेत्राशी संबंधित आहात, त्या क्षेत्रात एआय काय इम्पॅक्ट करू शकते, याचे अंदाज बांधत चर्चा होणे स्वाभाविक आहे. आयटी क्षेत्रात काय होईल, एकूण अर्थव्यवस्थेत किती बेरोजगारी होऊ शकते, इत्यादी.
एआयबद्दल दुसऱ्या चर्चा घडत आहेत त्या अमेरिका-स्थित एआय कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतींमध्ये फुगा (ॲसेट बबल) तयार झाला आहे का? असे असेल तर तो अचानक फुटेल का? अमेरिकेतील २००२ मधील डॉट-कॉम, २००८ मधील सबप्राइम वित्तीय अरिष्टासारखे मोठे अरिष्ट येऊन बाजार कोसळेल का?
अमेरिकेतील शेअर बाजाराचा परिणाम भारतासकट सर्वच शेअर बाजारांवर नेहमीच होत असतो. त्यामुळे असे काही घडले तर भारताच्या शेअर बाजारावर काय परिणाम होईल? इत्यादी.
भारतात गेल्या काही वर्षांत अनेक मध्यमवर्गीय आपल्या बचती शेअर मार्केटमध्ये गुंतवू लागले आहेत. आधीच्या सर्व अरिष्टांत त्यांची संख्या एवढी कधीच नव्हती. त्यामुळे तेवढा हलकल्लोळ माजला नव्हता. आता परिस्थिती वेगळी आहे. शेअर मार्केटमधील अरिष्ट लाखो गुंतवणूकदार कुटुंबांना लपेटू शकते. त्यामुळे त्यांनी किमान माहिती ठेवली पाहिजे.
अमेरिकेतील एआय कंपन्यांचे शेअर्स वर-खाली होत आहेतच; पण पहिली विकेट पडली ती दक्षिण कोरियाच्या एआय कंपन्यांची आणि म्हणून तेथील एकूणच शेअर मार्केटची.
मागच्या आठवड्यात KOSPI (जसा आपला सेन्सेक्स) हा दक्षिण कोरियन निर्देशांक त्याच्या ऐतिहासिक उंचीवरून तीन सत्रांत ४० टक्क्यांपेक्षा जास्त खाली आला. (गेल्या दोन दिवसांत तो काहीसा सावरला आहे.) गेल्या वर्षभरात KOSPI १८० टक्क्यांनी वधारला. यावरून तेथे काय धमाल सुरू असेल, याचा अंदाज येईल.
निर्देशांक वधारला याचा अर्थ असा नाही की सर्व किंवा बहुसंख्य कंपन्यांचे शेअर्स त्या प्रमाणात वधारले.
Samsung आणि SK Hynix या फक्त दोन कंपन्यांचा KOSPI मधील वाटा ५० टक्के आहे. (अमेरिकेतदेखील मुठभर एआय कंपन्यांच्या शेअर्समुळे शेअर मार्केट ऐतिहासिक उंचीवर आहे.) वरील दोन कोरियन कंपन्यांचे शेअर्स तीन दिवसांत अनुक्रमे २५ टक्के आणि ३० टक्क्यांनी खाली आले होते. त्या तीन दिवसांत तीन वेळा सर्किट ब्रेकर लावावे लागले होते. काही लाख कोटींचे बाजारमूल्य स्पिरिटसारखे उडाले.
या नाट्यपूर्ण कोसळण्याला अनेक कारणे सांगितली जात आहेत. पण एक महत्त्वाचे कारण ठरले ते म्हणजे मे महिन्यात वरील फक्त दोन कंपन्यांच्या शेअर्सवर आधारित Exchange Traded Fund (ETF) मध्ये गुंतवणूकदार कर्ज काढून गुंतवणूक करू लागले.
अडाणीपणाची हद्द झाली. मुळात ETF ही संकल्पना मोठ्या बास्केटची आहे, ज्यामुळे risk diversification होऊ शकते.
अर्थात, हे नवीन प्रॉडक्ट आणि प्रणाली तेथील शेअर मार्केटच्या नियामक मंडळाच्या परवानगीने सुरू झाली होती.
याचा फायदा घेत अनेक गुंतवणूकदारांनी ब्रोकरेज हाऊसेसकडून कर्जे काढून त्यावर या दोन कंपन्यांच्या शेअर्सवर सट्टा खेळण्यास सुरुवात केली. या ETF प्रॉडक्टमध्ये रिटेल गुंतवणूकदारांचा वाटा ९० टक्के होता.
आपल्या बचती घालून शेअर्समध्ये गुंतवणूक करणे आणि कर्ज काढून गुंतवणूक करणे हे भिन्न प्रकार आहेत. कर्ज काढून तुम्ही ज्यावेळी शेअर्समध्ये गुंतवणूक करता, त्यावेळी ते शेअर्स कर्ज देणाऱ्या ब्रोकरेज हाऊसकडे कर्जासाठी सुरक्षा म्हणून गहाण ठेवले जातात.
आणि असा लिखित करार असतो की, जर शेअर्सच्या किंमती घसरल्या आणि दिलेले कर्ज धोक्यात आले, तर एकतर ब्रोकर गुंतवणूकदाराला अधिकचे पैसे भरायला सांगतो. त्याला मार्जिन कॉल असे म्हणतात. किंवा तुम्ही भरू शकला नाहीत, तर ब्रोकर त्याच्याकडे असलेले शेअर्स विकून कर्जाची परतफेड करून घेऊ शकतो. दक्षिण कोरियात नेमके हेच घडले. फक्त काही दिवसांत दक्षिण कोरियातील शेअर मार्केट कोसळण्यात याचा मोठा वाटा आहे.
वरील दोन कंपन्यांच्या ETF मधील गुंतवणूकदारांमध्ये त्या देशातील तरुणांचे प्रमाण खूप मोठे आहे. पुरेसे उत्पन्न नाही, त्यामुळे घर घेता येत नाही, आर्थिक स्थिरता नाही, म्हणून लग्ने होत नाहीत… यामुळे झटपट पैसे कोठून मिळतील, याच्या शोधात तेथील तरुण पिढी असते. शेअर मार्केट, ETF मध्ये त्यांचा मोठा सहभाग त्यातून येत असतो.
जेवढे अरिष्ट वाढेल, तेवढे वित्तभांडवल अविवेकी होत जाणार आहे. सर्व गुंतवणूकदारांना आपल्या प्रभावक्षेत्रात ओढून घेणार आहे. त्यासाठी अजून नवीन प्रॉडक्ट्स शोधून काढली जाणार आहेत. गुंतवणूकदारांना गुंतवणूक आणि सट्टेबाजी यांतील सीमारेषा समजली पाहिजे.
भारतातील गुंतवणूकदारांसाठी, विशेषतः तरुण वर्गासाठी: तुमची पैशाची तंगी खरी आहे. पण झटपट पैशाच्या मागे लागू नका. आपली जोखीम क्षमता पाहून सट्टेबाज-सदृश शेअर बाजारात गुंतवणूक करा. कर्जे काढून अशा गुंतवणुका अजिबात करू नका. अमेरिकन आणि म्हणूनच जागतिक शेअर बाजारात लाल बावटे लागले आहेत. त्याबद्दल वाचा. समजून घ्या.
…….




