दूरदृष्टी, सुशासन आणि नवप्रगतीचे शिल्पकार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारताचे यशस्वी नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. या स्वप्नपूर्तीच्या दिशेने महाराष्ट्राची भक्कम वाटचाल सुरु आहे, ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वामुळे शक्य होत आहे.
राज्याच्या ‘ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’च्या दिशेने चाललेल्या प्रवासात फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयांचा मोलाचा वाटा आहे. प्रशासनावर त्यांची मजबूत पकड, सुशासनाची निकड, आणि समाजाभिमुख दृष्टिकोनामुळे महाराष्ट्रात विकासाचे नवे आयाम उभे राहत आहेत.
राजकारणात ते जितके कसलेले, तितकेच लोकसेवेत समर्पित. मंत्री म्हणून त्यांच्या सहवासात काम करताना विकास आणि समाजकारण यांचा सुंदर संगम जाणवतो.
फडणवीस यांनी नुकत्याच सरकारच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा थेट आढावा घेत, प्रत्येक विभागाचे मूल्यमापन जनतेसमोर खुलेपणाने सादर केले. हा धाडसी निर्णय त्यांच्या पारदर्शक आणि जनतेला जबाबदार ठेवल्याच्या कार्यपद्धतीचा नमुना आहे.
कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीचा नवीन अध्याय
फडणवीस यांच्या नेतृत्वात कौशल्य विकास, रोजगार व नाविन्यता विभागात क्रांतिकारी पावले उचलली गेली.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाअंतर्गत १.५ लाख युवक प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रात कामाची संधी, दरमहा ६ ते १० हजार रुपयांचे विद्यावेतन दिले जात आहे.
२०४ रोजगार मेळावे, २,४९२ उद्योजकांनी अधिसूचित केलेली १,२०,५७२ पदे आणि २३,८५४ उमेदवारांची निवड ही आकडेवारीच या योजनांच्या प्रभावीतेचा पुरावा आहे.
स्टार्टअप्ससाठी मुंबई, पुणे आदी ठिकाणी सुविधा केंद्रे उभारण्यात येत आहेत. महिलांसाठी विशेष सहाय्य योजना राबवली जात आहे.
“गिफ्ट सिटी”च्या धर्तीवर नवी मुंबईत ५०० कोटींचा खर्च करून अत्याधुनिक इनोव्हेटिव्ह सिटी उभारण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे.
सिंगापूरच्या ITEES संस्थेच्या सहकार्याने जागतिक कौशल्य विकास केंद्राची तयारी सुरू आहे.
निष्ठा, अनुशासन आणि नेतृत्वगुणांचा आदर्श
३० जून २०२२ रोजी राजकीय घडामोडींमध्ये, मुख्यमंत्री पदाचे नैसर्गिक पात्र असूनही फडणवीस यांनी पक्षाच्या आदेशाचे पालन करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी “व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा” हे मूल्य कृतीतून दाखवून दिले.
त्यांचे नेतृत्व हे केवळ प्रशासनपुरते मर्यादित नाही, तर ते प्रत्येक कार्यकर्त्याला प्रेरणा देणारे आहे.
त्यांच्या जन्मदिनी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना!
– मंगल प्रभात लोढा
मंत्री, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता
महाराष्ट्र राज्य