ताज्या बातम्यारायगड
“Re-KYC, जनधन खाते व विमा योजना — सुविधा आता आपल्या गावात”

रायगड : जिल्ह्यात जनधन खात्यांचे री-केवायसी (Re-KYC) आणि केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जनसुरक्षा योजनांची नोंदणी सुलभ करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत राबवले जात असून, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक विजय कुलकर्णी यांनी सर्व खातेदारांना या शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
या उपक्रमाची सुरुवात ३ जुलै रोजी जिल्हाधिकारी किशन जावळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या उपस्थितीत झाली. शिबिरांमध्ये बँक ग्राहकांना, रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, कमी रिस्क श्रेणीतील खातेदारांनी आपले बँक खाते Re-KYC करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास खाते निष्क्रिय होऊन सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे बँक आपल्या गावातच शिबिरे आयोजित करत असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिरांमध्ये ग्राहक आपली Re-KYC प्रक्रिया पूर्ण करू शकतील, तसेच प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजनेसाठी नोंदणीही करता येईल.
अभियानाअंतर्गत ११ ऑगस्ट २०२५ रोजी आगरी समाज विकास मंच, चिंचपाडा, पेण येथे सकाळी १० वाजता आणि ग्रुप ग्रामपंचायत हाल येथे सकाळी ११.३० वाजता विशेष मेळावे होणार आहेत.
या मेळाव्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक, क्षेत्रीय संचालक तसेच विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पेण आणि वडखळ येथील बँक शाखांच्या सहकार्याने आयोजित या मेळाव्यांमध्ये KYC अद्ययावत करणे, नवीन जनधन खाते उघडणे आणि सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध राहील.
पेण आणि वडखळ परिसरातील ग्रामस्थांनी या शिबिरांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.