अभिनेत्री प्रिया मराठे यांचे अल्पवयात निधन; कर्करोगाशी दीर्घ झुंज

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई : मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रिया मराठे (वय 38) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. काही महिन्यांपासून त्या कर्करोगावर उपचार घेत होत्या. सुरुवातीला त्यांनी या आजारावर मात केली होती आणि उपचारांनंतर परदेशातल्या एका नाटकाच्या दौऱ्यातही सहभाग घेतला होता. मात्र, पुन्हा एकदा कर्करोगाने डोके वर काढले आणि अखेर उपचारांना प्रतिसाद न दिल्याने त्यांचे दुर्दैवी निधन झाले.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार
मराठी प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवणाऱ्या प्रियाने चार दिवस सासुचे, पवित्र रिश्ता, तू तिथे मी, स्वराज्यरक्षक संभाजी, या सुखांनो या अशा गाजलेल्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. हिंदी मनोरंजन विश्वातही त्यांनी पवित्र रिश्ता, कसम से, बडे अच्छे लगते हैं यांसारख्या मालिकांतून लोकप्रियता मिळवली. विशेषत: पवित्र रिश्ता मालिकेत अंकिता लोखंडे हिच्या बहिणीच्या भूमिकेतून त्यांना घराघरात ओळख मिळाली.

वैयक्तिक आयुष्य
2012 मध्ये प्रियाने अभिनेता शंतनु मोघे याच्यासोबत विवाह केला. शंतनु मोघे यांनी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. या जोडप्याकडे मराठी मनोरंजन क्षेत्रातील सुंदर आणि यशस्वी जोडी म्हणून पाहिले जात होते.
अभिनय क्षेत्रात शोककळा
फार कमी लोकांना त्यांच्या कर्करोगाच्या आजाराबद्दल माहिती होती. गेल्या काही महिन्यांपासून त्या उपचार घेत असल्याचं सांगितलं जातं. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी घेतलेल्या एग्झिटमुळे मराठी अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.




