ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय

“एक वार, तीन शिकार” — रायगडच्या राजकारणात तटकरेंची धडक चाल

ऍडवोकेट प्रवीण ठाकूर यांच्या प्रवेशाने टाकला डाव


फडशा
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
आविष्कार देसाई 
रायगड : जिल्ह्याच्या राजकारणात सत्तेच्या बुरुजांना हादरवणारी चाल सुनील तटकरे यांनी खेळली आहे. शब्दशः ‘एक वार आणि तीन शिकार’ अशा थेट शैलीत त्यांनी काँग्रेसला पोकळ केलं आणि शेतकरी कामगार पक्षाच्या पायाखालची जमीनही सरकवली आणि शिंदे गटावर जबरदस्त राजकीय प्रहार केल्याचे चित्र आहे.
शनिवारी (2 ऑगस्ट) त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ऍडवोकेट प्रवीण ठाकूर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामावून घेतल आणि हा प्रवेश म्हणजे निव्वळ “पक्षबदल” नसून राजकीय रणधुमाळीत राजकीय सारीपाटावर फेकलेल्या सोंगाट्या आहेत.
काँग्रेसच्या गोटात भूकंप
ऍडवोकेट ठाकूर हे माजी आमदार दिवंगत मधुकर ठाकूर यांचे पुत्र असून, अलिबाग विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याची त्यांची जुनीच इच्छा आहे. मात्र महाविकास आघाडीत काँग्रेस, शेकाप आणि उद्धव ठाकरे गट एकत्र असल्याने 2024 मध्ये ही जागा शेकापकडे गेली आणि काँग्रेसला उमेदवारच देता आला नाही.
यामुळे ठाकूर यांचं राजकीय भविष्य अंधारात गेलं होतं. तेव्हा तटकरे यांनी हात पुढे केला आणि ‘शक्य अशक्य करता येतं’ हे पुन्हा एकदा सिद्ध केलं.
राजकीय जादूगाराचा डाव
तटकरे हे ‘राजकीय जादूगार’ म्हणून ओळखले जातात. त्यांनी ठरवलं तर अपक्षही आमदार होतात. आणि ठाकूर त्यांच्या नव्या लढाईतील प्यादं नाही, तर सोंगटीच आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
राष्ट्रवादीने ठाकूर यांना अलिबागमधून उमेदवारी दिल्यास, ही लढत चुरशीची नाही, तर राजकीय युध्द ठरणार हे निश्चित.
दळवींच्या विरोधात टाकला डाव?
विधानसभा निवडणुकीत पाडण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांनी थेट तटकरेंवर  केला आहे.
2015 मध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपद न मिळाल्यानं दळवी नाराज झाले. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
2024 मध्ये शिंदे गटातून निवडून आल्यानंतरही दळवी म्हणतात – “तटकरे माझ्या पाठीमागे हात धुवून लागले आहेत!”
तटकरे हे आपली कन्या मंत्री आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी मंत्री भरत गोगावले यांना रोखल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
आता तटकरेंनी आमदार दळवी यांच्यावर एडवोकेट ठाकूर यांचे कार्ड टाकून राजकीय घेराव केला आहे.
शेकापला चारी मुंड्या चीत करण्याचा  प्लॅन?
या खेळीचा दुसरा झटका शेतकरी कामगार पक्षाला बसला आहे.
तटकरे आणि जयंत पाटील यांच्यातील संघर्ष सगळ्यांना माहीत आहे. इतका की दोघं एकमेकांचं तोंडही पाहत नाहीत!
म्हणूनच तटकरेंनी अलिबागमध्ये ‘शेकापला संपवण्यासाठी’ ही मास्टरप्लॅनिंग केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात आहे.
संभाव्य लढत: तीन चुली, तीन भाज्या
जर राष्ट्रवादीने ठाकूर यांना उमेदवारी दिली तर लढत होईल:
महेंद्र दळवी (शिंदे गट)
चित्रलेखा पाटील (शेकाप)
प्रवीण ठाकूर (राष्ट्रवादी)
या त्रिकोणी लढतीत महायुतीतील मतांची विभागणी निश्चित आहे आणि त्यामुळे शेकापच्या पराभवाच्या शक्यता कमी होऊ शकतात. त्यातच जर भाजपाने उमेदवारी द्यायचे निश्चित केल्यास शेका पक्षातून भाजपात आलेल्या चित्रा पाटील यांच्या नावावर शिक्का मोर्तब  होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे महायुतीचा धर्म म्हणून प्रवीण ठाकूर यांचे नाव मागे पडल्यास नवल वाटायला नको.
त्रिकोणी लढत झाल्यास महायुतीतील मतांचं मोठं विभाजन होण्याची शक्यता आहे – आणि याचा थेट फायदा शेकापकडील चित्रलेखा पाटील यांना होऊ शकतो. मात्र यातूनही तटकरेंनी ठरवले तर शेका पक्षाच्या उमेदवाराला निवडून येण्यापासून ते रोखू शकतात.
शेकापची शांतता – वादळापूर्वीचं?
तटकरें यांनी इतकी मोठी खेळी टाकली असताना, शेकापकडून अजूनही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
हा शांतपणा म्हणजे पचवण्याचा प्रयत्न, की अंतर्गत घुसमट – हे लवकरच स्पष्ट होईल.
दरम्यान, “फडशा” पुढे पाडतच राहू – कारण रायगडमध्ये राजकारण हे सध्या निवडणूक नसून चकमक वाटतंय!
…..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button