शिवरायांचे १२ दुर्ग जागतिक नकाशावर; युनेस्कोच्या यादीत महाराष्ट्राचा अभिमान

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देणारे १२ किल्ले अखेर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सामील झाले आहेत. हा क्षण संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाचा आणि ऐतिहासिक आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
या यादीत साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूमधील जिंजी किल्ला यांचा समावेश करण्यात आला आहे. हे नामांकन गेल्या वर्षी युनेस्कोकडे सादर करण्यात आले होते.
“हे किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचं जिवंत प्रतीक असून, जागतिक स्तरावर शिवरायांचा तेजस्वी वारसा पोहोचण्याचा हा ऐतिहासिक टप्पा आहे,” असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आणि भारतीय पुरातत्त्व विभागाचे आभार मानले.
उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वतः या नामांकनासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी स्पष्ट केले की राज्य शासन या गड-किल्ल्यांचे संवर्धन, जतन आणि प्रेरणास्थळ म्हणून विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे.
“ही ऐतिहासिक घडामोड सर्व शिवप्रेमी आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानास्पद आहे,” असे म्हणत त्यांनी सर्वांना मनःपूर्वक अभिनंदन दिले.