ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

शेकापला जाग आली, राष्ट्रवादी आक्रमक झाली – रायगडमध्ये राजकीय समीकरणांचा स्फोट!

रायगडमध्ये राजकीय भूकंप! शेकापचं रणशिंग, राष्ट्रवादीचा सुरुंग – काँग्रेस-शिंदे गटाची घसरगुंडी!


 

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

रायगड : जिल्ह्यात आजची तारीख भविष्यात राजकीय भूकंप म्हणून ओळखली जाईल! शेकापच्या पनवेल अधिवेशनातून फुंकलेले रणशिंग, अलिबाग-माणगावमध्ये काँग्रेस आणि शिंदे गटाला बसलेले जोरदार धक्के, आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आक्रमक खेळ यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ घडून आली आहे.

पनवेलमधील शेतकरी कामगार पक्षाच्या ७८व्या अधिवेशनात मनसे प्रमुख राज ठाकरे यांना व्यासपीठावर बसवून नव्या आघाडीचा इशारा दिला गेला. सत्ताधाऱ्यांच्या गोंधळलेल्या धोरणांना उत्तर देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी हा रणसंग्राम ठरला.

दुसरीकडे, अलिबागमध्ये झालेल्या जाहीर पक्ष प्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत एकाच वेळी काँग्रेस आणि शिंदे गटाचे बुरुज कोसळवणारा जोरदार राजकीय स्फोट झाला. काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे पुत्र अॅड. प्रवीण ठाकूर यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत काँग्रेसला रामराम ठोकला, तर माणगावातील शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते अॅड. राजू साबळे यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश करून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर हल्ला चढवला.

याच वेळी बेलोशी, मापगाव, मानकुळे, धोकवडे आदी भागातील ग्रामपंचायत व जिल्हा परिषद सदस्य, आणि शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे अलिबाग आणि माणगाव मतदारसंघातील भाजप समर्थित गटांची पकड ढिली होण्याची चिन्हं आहेत.

कार्यक्रमात बोलताना अॅड. प्रवीण ठाकूर यांनी थेट नाव न घेता आमदार महेंद्र दळवी यांना इशारा देत सांगितले, “कोणी आमच्या नेत्यांवर वाईट बोलले, तर गाठ आमच्याशी आहे!” जनतेच्या प्रश्नांसाठी आणि स्व. मधुकर ठाकूर यांच्या वारशाला पुढे नेण्यासाठी आम्ही काँग्रेस सोडली, असे ते म्हणाले.

विशेष म्हणजे, पक्षप्रवेश सोहळा तब्बल सव्वातास उशिराने सुरू झाला. कार्यकर्त्यांना ताटकळत बसावे लागले, मात्र उपस्थितीमुळे सभागृह फुलून गेले होते.

कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत पालकमंत्री पदाच्या चर्चेवर खोचक टिप्पणी करत, “रायगडचा पालकमंत्री आम्ही तिघे ठरवणार,” असे वक्तव्य केल्यावर क्षणभर सभागृहात खळबळ उडाली. त्यानंतर त्यांनी तातडीने शहाणपणाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत परिस्थिती हाताळली.

खासदार सुनील तटकरे यांनी अॅड. प्रवीण ठाकूर यांची राज्यकारभारातील युक्तिवाद करण्याची क्षमता अधोरेखित करत, “आता त्यांनी पक्षासाठी युक्तिवाद करायचा आहे,” असा विश्वास व्यक्त केला.

रायगड जिल्ह्यात सध्या सुरू असलेली राजकीय चलबिचल, पक्षांतरणं, आणि चतुर संवादांच्या या मालिकेनं स्पष्ट केलं आहे की, आगामी निवडणुकांमध्ये ‘समीकरणं नव्यानं लिहिली’ जाणार आहेत. आणि यात कोण सत्तेवर, कोण मातीत हे ठरवण्यासाठी जिल्ह्याच्या जनतेचा कौल निर्णायक ठरणार आहे!

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button