ताज्या बातम्या

“भोकरीच्या आठवणी – रानभाजीची चव, आजीच्या हातून!”


आज साठीत असलेली पिढी आठवेल – बालपणी पतंग बनवण्यासाठी, वह्या-पुस्तकांच्या फाटलेल्या पानांना चिकटवण्यासाठी आपण पिकलेली, गोडसर व चिकट भोकरं शोधून आणायचो. रानावर, बांधावर सापडणारी ही भोकरं खेळण्यातली एक मजा होती. कुठे त्यांना बारगुंड, कुठे गुंदन म्हणायचे – नावं वेगळी, पण आठवणी तीच!

आज मात्र ही भोकरं, ही रानभाजी आणि त्यांच्याशी जोडलेली आपली आजी – तिचा बटवा, तिची शिदोरी आणि तिचा अनमोल अनुभव – या सगळ्या गोष्टी काळाच्या ओघात हरवताना दिसत आहेत. हीच परंपरा जपण्याचा एक सुंदर प्रयत्न म्हणजेच ‘आजीची भाजी – रानभाजी’ ही माहितीमालिका.

ही मालिका महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व आत्मा (ATMA), रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत राबवली जात आहे. आजच्या भागात आपण ओळख करून घेणार आहोत भोकराच्या रानभाजीची.

🌱 भोकर – औषधी गुणांची खाण

भोकराचं फळ हे स्नेहन व संग्राहक (अ‍ॅस्ट्रिंजंट) गुणधर्म असलेलं आहे. यामध्ये अनेक औषधी उपयोग दडलेले आहेत:

कृमिनाशक व कफोत्सारक

कोरडा खोकला, छातीचे व मूत्रनलिकेचे विकार

पित्तप्रकोप, दीर्घकालीन ताप

तहान कमी करणं व जखमा भरून येण्यासाठी उपयुक्त

साल स्तंभक (अ‍ॅस्ट्रिंजंट) असून फुफ्फुसाच्या विकारांवर गुणकारी

सालाचं चूर्ण त्वचारोगांवर आणि खाजेवर वापरतात

🍲 भोकराची भाजी – आजीच्या हातचं चविष्ट वैद्यक

🥬 पानांची भाजी

साहित्य:

भोकराची कोवळी पाने

कांदा, हिरव्या मिरच्या

भिजवलेली मूगडाळ

हळद, मीठ, थोडं तेल

कृती:
पाने निवडून स्वच्छ धुवून, देठ काढून टाकावेत. नंतर पाने बारीक चिरावीत. कढईत थोडं तेल गरम करून त्यात कांदा व मिरच्या परतून घ्याव्यात. कांदा तांबूससर होईपर्यंत परतल्यावर त्यात चिरलेली पाने, मूगडाळ, हळद आणि मीठ घालून परतावं. थोडं पाणी घालून ही भाजी चांगली शिजवावी.

🍛 फळांची भाजी

साहित्य:

भोकराची कोवळी फळं

तीळ, खसखस, ओलं खोबरं

आले, लसूण, कांदा

हळद, तिखट, मीठ, थोडं तेल

कृती:
फळं स्वच्छ धुऊन त्यातील बिया काढून टाकाव्यात व पुन्हा चिरावं. तीळ आणि खसखस हलके भाजून, ओलं खोबरं, आले व लसूण यांच्यासोबत मिक्सरमध्ये वाटून ओला मसाला तयार करावा. तेलात कांदा तांबूससर होईपर्यंत परतावा. त्यात भोकराचे चिरलेले फळं, हळद, तिखट, मीठ घालून परतावं. नंतर त्यात ओला मसाला घालून थोडं परतून शिजवावं.

🫙 फळांचं लोणचं

साहित्य:

भोकराची कोवळी फळं

मोहरी डाळ, हिंग, मिरे पूड, मिरची पूड, हळद, मेथी पावडर

मीठ, तेल

कृती:
फळं धुऊन बिया काढाव्यात व गरजेनुसार फोडी कराव्यात. काही पद्धतींमध्ये फळं अखंडही ठेवतात. फोडींना मीठ लावून चोळावं. एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी डाळ, हिंग, मिरची पूड, मिरे पूड, हळद व मेथी पावडर टाकून फोडणी तयार करावी. फोडणी थंड झाल्यावर मीठ लावलेल्या फळांवर ओतावी. हे सर्व मिश्रण एकत्र करून बरणीत भरावं. काही दिवस झाकण बंद करून ठेवावं. नंतर स्वादिष्ट लोणचं तयार!

📜 एक आठवण, एक परंपरा!

काय वाचकहो, आठवलीत का ती भोकरी?
तांबूससर, गोडसर, थोडीशी चिकट… पण मस्त!
एखाद्या रविवारी, आजीच्या आठवणींना उजाळा देत ही भाजी करून बघा आणि बालपणात रमून जा.

✍️ प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी
📞 9403464101


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button