शब्दांनी रंगली, हास्याने दरवळली – अलिबागची साहित्यसभा
हास्यछटांनी उजळली कोमसाप अलिबागची मासिक मैफल

अलिबाग : कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) अलिबाग शाखेची मासिक साहित्य सभा नुकतीच साहित्यप्रेमी रमेश धनावडे यांच्या निवासस्थानी उत्साहात संपन्न झाली. ह्या बैठकीत हास्यरस, विडंबन आणि निसर्गसौंदर्य यांनी सजलेली बहुरंगी साहित्यिक मैफल रंगली.
उपाध्यक्षा निर्मला फुलगावकर यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त आणि अहवाल वाचून सभेची सुरुवात केली. सभेचे प्रमुख आकर्षण ठरले ज्येष्ठ साहित्यिक अनंत देवघरकर यांचे ‘उपास तापास करायचे’ हे चटपटीत विडंबन गीत.
तालुका प्रतिनिधी रमेश धनावडे यांनी आपल्या ‘नादखुळा’ काव्यसंग्रहातील ‘मी असा कसा नावाचा राहिलो नवरा’ हे गीत गाऊन उपस्थितांना हास्याच्या लाटेत चिंब भिजवले.
पूर्वा लाटकर यांनी ‘आणि आबा आलेच नाहीत’ या लेखाचा उतारा वाचून रसिकांना गुंतवून ठेवलं. मीनल तवटे यांच्या ‘दिवस तुझे हे डायटचे’ या विडंबन गीताने हास्याचा कल्ला उडवला.
वर्षा दिवेकर यांनी पु. ल. देशपांडे यांचा ‘गवय्या होते होते’ हा लेख रसाळ शैलीत वाचून रंगत वाढवली. पानसरे मॅडम यांनी झाडांवर आधारित निसर्गकविता सादर केली.
मेघना म्हात्रे यांनी ‘श्रावण मासी हर्ष मानसी’ ही कोवळी कविता सादर करून श्रावणातला गारवा निर्माण केला. वंदना मोरे यांनी खुसखुशीत विनोद सादर करून हास्यलाट उसळवली.
साठे सरांनी ‘चहा’ या विषयावर कविता सादर केली, तर नागेश कुलकर्णी यांनी स्वतःचे अनुभव कथन करत विनोद कसा जन्म घेतो हे मनोरंजक पद्धतीने सांगितले.
सागर नार्वेकर यांनी स्वतः लिहिलेला ‘चष्मा’ हा ललित लेख सुंदर अभिवाचनाद्वारे सादर करत रसिकांची वाहवा मिळवली.
शाखाध्यक्ष सुजाता पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान रमेश धनावडे यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. सर्वांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला.
कार्यक्रमाचे व्यवस्थापन पूनम धनावडे, अपूर्वा धनावडे आणि राजेश्री पाटील यांनी नेटकेपणे पार पाडले. अल्कोपहारानंतर रमेश धनावडे यांनी सर्वांचे आभार मानून सभेची सांगता केली.