ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय

शेकापला राजकीय पुनरुत्थानासाठी अखेरची संधी? 78व्या वर्धापन दिनी पनवेलमध्ये निर्णायक अधिवेशन; राज ठाकरे उपस्थित


फडशा
आविष्कार देसाई
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
रायगड : पक्ष नेतृत्वाचे चुकलेले राजकीय अंदाज, घरभेदांनी पोखरलेला, सत्तेपासून दूर गेलेला आणि गळतीने उध्वस्त झालेला शेतकरी कामगार पक्ष आज निर्णायक वळणावर उभा आहे. पनवेलमध्ये होत असलेलं ७८वं वर्धापन दिनाचं अधिवेशन हे केवळ एक सोहळा नसून, शेकापच्या राजकीय पुनरुत्थानासाठीची ‘अखेरची संधी’ ठरू शकतं, का हा खरा प्रश्न आहे.
पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी खास निमंत्रण देण्यात आले आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांना. त्यांच्या भाषणातून पक्षातील मरगळ जाईल, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येईल आणि नव्या दमाने लढण्यासाठी प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मात्र प्रश्न कायम आहे — ही फक्त उठावदार उपस्थिती ठरणार? की पक्षाच्या नव्या पर्वाची सुरुवात?
दरम्यान, शेकापचे सरचिटणीस आणि पक्षाचे प्रमुख चेहरा असलेले माजी आमदार जयंत पाटील यांच्यासमोरही स्वतःची राजकीय पुनर्स्थापना करण्याचं मोठं आव्हान आहे. काही वर्षांतील पक्षाच्या चुकीच्या राजकीय भूमिका आणि दिशाहीन निर्णयांबद्दल त्यांनी “राजकीय अंदाज चुकले” अशी उघडपणे कबुली दिली आहे. त्यामुळे या अधिवेशनातून पुढे काय दिशा ठरते, यावर पाटील यांच्या भविष्यातील राजकीय विश्वासार्हतेचीही कसोटी लागणार असल्याचे बोलले जाते.
राज्यातील विविध भागांतून शेकापचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने पनवेलकडे मार्गस्थ झाले आहेत. पक्षाला नवसंजीवनी देण्याचा निर्धार या अधिवेशनात दिसून येत आहे. आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवता, पक्षाचे कार्यपद्धती आणि संघटन बळकट करण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
जयंत पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान
शेकापचे सरचिटणीस व माजी आमदार जयंत पाटील यांच्यासाठी हे अधिवेशन निर्णायक मानले जात आहे. पक्षाच्या गळतीनंतर नव्याने संघटन उभे करण्यासाठी त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. गेल्या काही वर्षांत पक्षात मोठ्या प्रमाणावर नेतृत्वाची आणि कार्यकर्त्यांची पडझड झाली आहे.
विशेष म्हणजे, जयंत पाटील यांचे भाऊ आमदार पंडित पाटील, भावना पाटील, तसेच त्यांचे भाचे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील, माजी अर्थसभापती चित्रा पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ही घरातील फूट पक्षासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
राजकीय भूमिका आणि आगामी रणधुमाळी
शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी शिंदे गटाला क्रमांक एकचा राजकीय शत्रू घोषित केले असले, तरी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याबाबत भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे शेकापसाठी भविष्यातील युतीसंदर्भात अनेक पर्याय खुले राहण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर, राज ठाकरे यांची अधिवेशनातील उपस्थिती पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राजकीय लढ्यांसाठी शेकापला आता सुस्पष्ट रणनीती तयार करून नव्या दमदार नेतृत्वाची फळी उभारणे अत्यावश्यक ठरत आहे.
शेकापपुढील मार्ग – आत्मपरीक्षण आणि नवसंघटन
शेकापने आता जुन्या-नव्या कार्यकर्त्यांमध्ये संवाद, समन्वय आणि सहकार्याची सांगड घालणे अत्यावश्यक ठरणार आहे. पक्षात जर हेकटपणा किंवा ‘हम करे सो कायदा’ अशी वृत्ती राहिली, तर शेकापसाठी ते घातक ठरू शकते.
पक्षाचे अस्तित्व व ताकद टिकवण्यासाठी, आगामी काळात सशक्त युवा नेतृत्व, जाणते मार्गदर्शक, आणि राजकीय स्पष्टता ही तीन महत्त्वाची शस्त्रे ठरणार आहेत.
पनवेल अधिवेशन हे केवळ एक साजरा करणारे व्यासपीठ नसून शेकापसाठी आत्मचिंतन व पुनरुज्जीवनाचा निर्धार करण्याची महत्त्वाची संधी ठरणार आहे. आता पाहावे लागेल की, या अधिवेशनातून शेकापची नव्याने वाटचाल सुरु होते का, आणि राज ठाकरे यांचा प्रभाव पक्षाला नवसंजीवनी देऊ शकतो का, याचे उत्तर लवकरच स्पष्ट होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button