“आरडीसीएच्या मैदानाच्या मागणीला मंजुरीची वाट; महसूलमंत्र्यांकडून सकारात्मक संकेत”

रायगड : जिल्हा क्रिकेट असोसिएशनला (आरडीसीए) राज्य शासनाकडून दीर्घ मुदतीसाठी कायमस्वरूपी मैदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी मंगळवारी (दि. 29 जुलै) आरडीसीएच्या पदाधिकाऱ्यांसह राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन या संदर्भातील मागणी मांडली. या मागणीला मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी रायगड यांना योग्य जागेचा शोध घेऊन शासनास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
आरडीसीएकडे सध्या स्वतःचे मैदान नसल्यामुळे विविध वयोगटातील क्रिकेट स्पर्धा आणि सराव शिबिरांसाठी त्यांना खासगी कंपन्या किंवा क्लबच्या मैदानांवर अवलंबून राहावे लागते. यामुळे अनेक वेळा नियोजनावर मर्यादा येतात. ही अडचण दूर करण्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार ठाकूर आणि बालदी यांनी शिष्टमंडळासह महसूलमंत्र्यांची भेट घेतली.
या भेटीत आरडीसीएला कायमस्वरूपी मैदान मिळाल्यास रायगडमधील होतकरू खेळाडूंना भक्कम व्यासपीठ मिळेल, असे मत मांडण्यात आले. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननेही (एमसीए) लिखित पत्राद्वारे मैदानासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगण्यात आले. यामुळेच जिल्ह्याच्या क्रीडा भविष्याला चालना देण्यासाठी शासनाच्या मालकीची जागा दीर्घकालीन करारावर देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली.
शिष्टमंडळात आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, उपाध्यक्ष यशवंत साबळे, सदस्य शंकर दळवी, प्रदीप खलाटे, विनय पाटील यांचा समावेश होता. महसूलमंत्र्यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाला पुढील कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले.