ताज्या बातम्या
“ओम फट स्वाहा! विधीमंडळात गोगावले आणि गोऱ्हेंच्या एन्ट्रीवर घोषणांचा भडिमार”

मुंबई, जुलै २०२५ : राज्याच्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन जोरात सुरू आहे. विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मराठी अस्मिता आणि भाषेच्या मुद्द्यावरून मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी एकत्र येत मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढला. सकाळी १० वाजता बालाजी हॉटेल ते मीरारोड स्टेशनदरम्यान निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं.
मोर्च्याचे प्रतिबिंब विधान भवनातही दिसून आलं. सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. याच दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे सभागृहात पोहोचल्या, तेव्हा त्यांच्या एन्ट्रीला विरोधकांकडून “मर्सिडीज एकदम ओके” अशा खोचक घोषणा दिल्या गेल्या. काही क्षणांनी नीलम गोऱ्हे यांनी मागे वळून पाहिलं आणि आदित्य ठाकरेकडे रोखून एक रागीट नजर टाकली, असे दृश्य पाहायला मिळाले.
त्यानंतर थोड्याच वेळात, अघोरी पूजेच्या आरोपांमुळे वादात सापडलेले शिवसेना शिंदे गटाचे नेते व राज्यमंत्री भरत गोगावले सभागृहात दाखल झाले. तेव्हा विरोधकांनी त्यांच्यावर “ओम फट स्वाहा!” अशा घोषणा देत जोरदार टीका केली. रायगडचा पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी गोगावले यांनी अघोरी पूजा केली होती, असा दावा काही विरोधकांनी याआधी केला होता. त्या पार्श्वभूमीवरच आजची ही खोचक प्रतिक्रिया होती.