ताज्या बातम्या
संशयित बोट प्रकरणावर पोलिसांनी टाकला पडदा

रायगड : जिल्ह्यातील कोरलई समुद्रात दिसलेली संशयास्पद बोट ही प्रत्यक्षात बोट नसून ‘बोया असल्याचे AIS ट्रान्सपोंडरद्वारे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे.त्यामुळे गेल्या 24 तासापासून सुरू असलेल्या संशयित बोट प्रकरणावर रायगड पोलिसांनी पडदा टाकला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली होती. याबाबत कोणालाही माहिती देण्यात येत नव्हती विशेषतः प्रसार माध्यमांना यापासून दूर ठेवण्यात आले होते.
06 जुलैच्या रात्री भारतीय तटरक्षक दलाला रायगड जिल्ह्यातील कोर्लई किल्ल्याजवळ एक संशयित बोट आढळल्याची माहिती मिळाली. ‘Muqadar Boya 99’ नावाची ही बोट MMSI-463800411 क्रमांकाची असून ती पाकिस्तानातून आलेली असण्याची शक्यता वर्तवली गेली होती. तटरक्षक दल, नौदल व दिल्ली येथून मिळालेल्या माहितीच्या आधारे रायगड जिल्हा पोलिस दल सतर्क झाले. सदरची बोट अत्यंत संवेदनशील पद्धतीने कोस्टल अलर्ट अंतर्गत आढळल्यामुळे पोलिस दलाकडून तात्काळ तपास सुरू करण्यात आला. बोटमध्ये कोणीही उपस्थित नव्हते, मात्र तिचा संशयास्पद स्वरूप व स्थल निश्चितीमुळे अधिक तपासासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी, शासकीय यंत्रणा आणि गुप्तचर विभाग घटनास्थळी दाखल झाले होते.
या नंतर पोलीस दलाने तट रक्षक दल, सीमा शुल्क विभाग, नौदल, मत्स्य व्यवसाय विभाग, मेरी टाईम बोर्ड यांनी जिल्ह्याच्या विविध भागात मोहीम हाती घेतली आहे. भारतीय तटरक्षक दला कडील हेलिकॉप्टर द्वारे समुद्र किनाऱ्याची टेहळणी करण्यात येत आहे.
रायगड पोलीस दलातील 52 अधिकारी विविध मोहिमेत सहभागी झालेत, असेही पत्रकात नमूद केले आहे.
….