स्वच्छता रॅली व वृक्षारोपणाने कलोते-खालापूर व महाड परिसरात जनजागृतीचा संदेश
– डॉ. विजय कोकणे : "वृक्षारोपणाइतकेच त्यांचे संगोपनही तितकेच महत्त्वाचे"

रायगड : जन शिक्षण संस्थान रायगडच्या वतीने कलोते-खालापूर आणि महाड येथे गुरुवारी “स्वच्छता रॅली व वृक्षारोपण” कार्यक्रम उत्साहात पार पडला. स्वच्छता, आरोग्य जनजागृती, पर्यावरण रक्षण आणि सरकारी योजनांचा प्रसार या उद्देशाने राबवण्यात आलेल्या उपक्रमात स्थानिक नागरिक, प्रशिक्षणार्थी आणि संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
प्रशिक्षणार्थींना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले, तसेच उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. कार्यक्रमादरम्यान स्वच्छतेविषयी माहिती व जनजागृतीही करण्यात आली.
या उपक्रमासाठी डॉ. मेधा सोमैया (संस्थापक अध्यक्षा), डॉ. नितीन गांधी (अध्यक्ष), रत्नप्रभा बेल्हेकर (उपाध्यक्ष) आणि डॉ. विजय कोकणे (संचालक) यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमात बोलताना डॉ. विजय कोकणे यांनी सांगितले की, “वृक्षारोपण जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यांचे संरक्षण व संगोपनही आवश्यक आहे.”
16 ते 31 जुलै या कालावधीत रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वच्छतेवर आधारित जनजागृती कार्यक्रम राबवले जाणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या पुढाकाराने संस्थेच्या माध्यमातून मागील 20 वर्षांपासून व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य सुरू आहे आणि आतापर्यंत 70 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
या उपक्रमात कलोते-खालापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ललिता ठोंबरे, बचत गट प्रतिनिधी सुजाता पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कल्पना म्हात्रे आणि भाग्यश्री पुसाळकर, प्रशिक्षिका रेश्मा दळवी, स्वप्नाली म्हात्रे, अपर्णा मोरे, दिगंबर मोरे आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.