स्वच्छता आणि हरिततेचा संगम! श्रीवर्धनमध्ये JSS रायगडतर्फे विशेष उपक्रम राबवला

श्रीवर्धन : जन शिक्षण संस्थान (JSS) रायगडच्या वतीने श्रीवर्धन येथे दि. 22 जुलै 2025 रोजी “स्वच्छता रॅली व वृक्षारोपण” उपक्रम उत्साहात पार पडला. जनसामान्यांमध्ये सरकारी योजना, आरोग्य जनजागृती, स्वच्छता अभियान, कौशल्य विकासाचे महत्व आणि पर्यावरण रक्षणाबाबत प्रबोधन करण्याच्या हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमादरम्यान सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले तसेच स्वच्छतेची शपथही सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कु. भाग्यश्री पुसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आली. या उपक्रमात वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला गेला.
कार्यक्रमामध्ये JSS रायगडच्या प्रशिक्षणिका सौ. विप्राली पुसाळकर, सौ. भाविका जोशी, सौ. अफसरी अराई यांच्यासह अनेक प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा सोमैया, अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, उपाध्यक्ष सौ. रत्नप्रभा बेल्हेकर आणि संचालक डॉ. विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात गेल्या 20 वर्षांपासून कौशल्य विकास व व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य प्रभावीपणे सुरू आहे. भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या विशेष पुढाकारातून ही कामगिरी अधिक व्यापक स्तरावर पोहोचवली जात आहे.