विद्यार्थ्यांसाठी आरोग्याची शाळा – सामाजिक संस्था आणि डॉक्टरांचे संयुक्त पाऊल
अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनकडून आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन

अलिबाग : सामाजिक जबाबदारी जपत अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन आणि अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तगट तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. या उपक्रमात भारती डायग्नोस्टिक यांचे सहकार्य लाभले.
शिबिराचे उद्घाटन वेश्वी ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका पवार, शाळा समितीच्या अध्यक्षा प्रवीणा भगत आणि उपसरपंच जयेंद्र भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरात डॉ. वैभव भगत (अध्यक्ष – अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिएशन), डॉ. अमेय केळकर, डॉ. ओमकार पाटील, डॉ. वैजेश पाटील, डॉ. समीर धाटावकर, डॉ. गणेश गवळी, डॉ. निशिकांत ठोंबरे, डॉ. भूषण शेळके, डॉ. संकेत मोरे यांनी विद्यार्थ्यांची कान, नाक, घसा, छाती, पोट, हृदयाचे ठोके, रक्तदाब आणि दातांची तपासणी केली तसेच आवश्यक औषधोपचारही मोफत पुरवण्यात आले.
शिबिरात भारती डायग्नोस्टिकचे राकेश थळे, रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडीओग्राफर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष समीर मालोदे, खजिनदार जितेंद्र मेहता, शाळेच्या मुख्याध्यापिका सुगंधा पाटील, शिक्षक चंद्रकांत काटकर, नितीन पाटील, संध्या कडू, तसेच वाडगावच्या माजी सरपंच सरिता भगत, बापदेव सामाजिक संस्थेचे सचिव प्रभाकर भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष तुषार थळे, सचिव विकास पाटील, खजिनदार विवेक पाटील, सल्लागार सुरेश खडपे, सदस्य अमर मढवी, अभिजित काटकर, विजय पाटील, गणेश जाधव, योगेश सावंत, सुनील भगत यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
गेल्या अनेक वर्षांपासून अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवत असून, ग्रामीण भागातील नागरिकांना त्याचा मोठा फायदा होत आहे. या शिबिरात एकूण ६३ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.
हा स्तुत्य उपक्रम भविष्यातही नियमित राबवण्याचा मानस असोसिएशनने व्यक्त केला.