इलेक्ट्रिक भविष्यासाठी टेस्लाची भारतात एंट्री; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र देशातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते आज मुंबईतील पहिल्या टेस्ला एक्सपीरियन्स सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्लाने भारतीय बाजारात अधिकृतपणे प्रवेश केला असून, त्याची सुरुवात महाराष्ट्रातून होत आहे. उद्घाटनप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धवसे आणि टेस्ला कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “जगातील सर्वात स्मार्ट कार भारतात आली असून, तिची सुरुवात महाराष्ट्रातून होत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. टेस्लाने भारतात आपली अधिकृत उपस्थिती जाहीर केली असून, मुंबईतील हे केंद्र केवळ शो रूम नसून, डिलिव्हरी हब, लॉजिस्टिक सेंटर आणि सर्विसिंग युनिटसह कार्य करणार आहे. कार्सचे बुकिंगही येथे सुरू झाले आहे.”
भारतासाठी आज टेस्ला Model Y लाँच करण्यात आली. ही कार १५ मिनिटांत चार्ज होऊन ६०० किमी अंतर पार करू शकते. शून्य प्रदूषण, जागतिक दर्जाची सुरक्षा प्रणाली यामुळे ही कार इको-फ्रेंडली आणि सुरक्षित आहे, असेही फडणवीस म्हणाले.
राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात गुंतवणुकीसाठी प्रभावी धोरण राबवले आहे. चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, कर सवलती आणि उत्पादन क्षेत्रासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. मुंबईनंतर देशातील आणखी दोन शहरांमध्ये टेस्लाच्या सेवा सुरू करण्यात येणार आहेत. तसेच मुंबईत चार चार्जिंग हब आणि ३२ चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.