ताज्या बातम्यामहाराष्ट्र
दोषी मोकाट, अहवाल लपवलेले! खुशबू ठाकरे प्रकरणी जनतेचा उद्रेक – ठिय्या आंदोलनाची हाक

पेण : वरवणे (ता. पेण) येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनी खुशबू ठाकरे हिचा कुष्ठरोगावरील उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सहा महिन्यांपूर्वी घडली होती. मात्र, आजपर्यंत या प्रकरणी कोणत्याही दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याने आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे.
या पार्श्वभूमीवर ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली १६ जुलै २०२५ पासून पेण तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भातील निवेदन तहसीलदार तानाजी शेजाळ आणि तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नवरखेड यांना देण्यात आले आहे.
—
ठिय्या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या:
१. खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणाचा आरोग्य विभागाचा चौकशी अहवाल व केमिकल अनालिसिस रिपोर्ट पोलिसांकडे सादर करण्यात यावा आणि सार्वजनिक करण्यात यावा.
२. हे अहवाल १६ जुलैपूर्वी उपलब्ध न झाल्यास, रिपोर्टची वाट न पाहता पालक व संघटनांच्या तक्रारीवरून दोषींवर गुन्हा दाखल करावा.
३. अहवालात नमूद दोषींविरुद्ध चौकशी करून चार्जशीट दाखल करण्यात यावी.
४. जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती विखे यांनी चौकशीत बेजबाबदार भूमिका घेतल्याने त्यांना पदावरून कार्यमुक्त करून गुन्हा दाखल करण्यात यावा.
५. खुशबूच्या पालकांना १० लाखांची नुकसानभरपाई देण्यात यावी.
६. सर्व आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक धोरणात्मक निर्णय तत्काळ घेण्यात यावेत.
—
निवेदन सादर करताना उपस्थित मान्यवर:
नामदेव ठाकरे (खुशबू ठाकरे यांचे वडील)
सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर
ग्राम संवर्धन समितीचे सदस्य नरेश कडू
खारेपाट विकास संकल्प संघटना: सी. आर. म्हात्रे सर
राजीव गांधी पंचायतिराज संघटना: नंदा म्हात्रे (राष्ट्रीय महासचिव)
महिला फेडरेशन: मोहिनी गोरे
सत्यशोधक चळवळ: संदिप पाटील (गागोदे)
आचार्य विनोबा भावे प्रतिष्ठान: संगीता ताई व वंदना जाधव
—
संतोष ठाकूर आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्व नागरिकांना, सामाजिक व राजकीय संघटनांना आवाहन केले आहे की, या लढ्याला समर्थन द्यावे आणि आदिवासी कन्येला न्याय मिळवून देण्यासाठी एकजुटीने सहभागी व्हावे.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन ३० जुलैपर्यंत सुरू असल्यामुळे, या प्रश्नावर सभागृहात पुन्हा चर्चा होण्याची शक्यता असून, सरकार यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.