“दहशतीतून जलसमाधीकडे! दुरशेत ग्रामस्थांचा प्रशासनाला अंतिम इशारा”
"मुलाबाळांसह नदीत उतरणार दुरशेत ग्रामस्थ; बेकायदेशीर रस्त्याविरोधात थेट आंदोलन"

पेण : दुरशेत गावातील महिला आणि लहान मुलेही आता रस्त्यावर उतरली असून प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात १७ जुलै रोजी सकाळी १० वाजता बाळगंगा नदीत सामूहिक जलसमाधी घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. अवजड वाहनांच्या धोकादायक वाहतुकीला प्रतिबंध, भयमुक्त रस्त्याची मागणी आणि बेकायदेशीर रस्त्यामुळे गाव बुडवण्याच्या प्रयत्नांचा निषेध करण्यासाठी हे टोकाचं पाऊल उचलण्यात येत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून दुरशेत ग्रामस्थ प्रशासनाकडे अर्ज-निवेदने देत आहेत. १७ जून २०२५ रोजी त्यांनी दुरशेत फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी तहसीलदारांनी लेखी आश्वासन दिलं होतं, मात्र महिनाभर उलटूनही काहीच कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, बाळगंगा नदीत भराव टाकून गावाला पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न सुरु आहे, जो पूर्णपणे बेकायदेशीर असून स्थानिकांच्या संमतीविना केला जात आहे. त्यामुळे आता सामूहिक जलसमाधी हीच अंतिम प्रतिकाराची भूमिका उरली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
उदय गावंड (8806559798), अजय भोईर (9209561969), नितेश डंगर (9158662583) या प्रमुख ग्रामस्थांसह महिला व लहान मुलेही आंदोलनात सहभागी होणार आहेत.
या गंभीर आणि टोकाच्या आंदोलनाकडे प्रशासन आणि राजकीय यंत्रणा गांभीर्याने लक्ष देणार का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.