ताज्या बातम्या
वरसोलीच्या विठोबा मंदिरात भजनांचा गजर; आषाढी उत्सव भक्तिरसात न्हाल

वरसोली : अलिबाग तालुक्यातील पावन श्रीक्षेत्र विठोबा देवस्थान, वरसोली येथे आषाढी एकादशीनिमित्त आयोजित संगीत भजन कार्यक्रमाला भाविकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. विविध भजनी मंडळींनी सादर केलेल्या भक्तिरसात न्हालेल्या या कार्यक्रमाने वातावरण विठुनाममय केले.
श्री क्षेत्र विठोबा देवस्थान, वरसोली येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित संगीत भजनांच्या कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत सार्थ सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री दत्तकृपा प्रासादिक महिला भजन मंडळ, अलिबाग यांच्या सुमधुर गायनाने झाली. प्रमुख गायिका कु. वेदिका कमलाकर म्हात्रे या गुरुवर्य रायगड भूषण निलेश जंगम यांच्याकडून प्रशिक्षित असून त्यांना स्वराज पाटील (पखवाज), प्रणय जंगम (तबला) आणि इतर मंडळींची उत्तम साथ लाभली.
कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी आणि देवस्थानचे अध्यक्ष रमेश नाईक यांच्या हस्ते कु. वेदिका म्हात्रे हिला विशेष सन्मान देण्यात आला.
यानंतर पंत महाराज प्रासादिक भजन मंडळ, कारले बुवा सुभाष भोबु आणि मंडळी, तसेच भजन सम्राट संदीप कडू, वेश्वी (उरण) यांचे भजन सादरीकरण झाले.
तत्पश्चात श्रुती बोंद्रे यांनी कीर्तनातून रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाची सांगता आरती स्वरवैभव संगीत भजन मंडळ, कर्जत यांच्या प्रभावी सादरीकरणाने झाली.
या दिवसभराच्या भक्तीमय उत्सवात सर्व भजनी कलाकारांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.