कोकणातील सेवाभावी वकिलाला ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार
सामाजिक कार्याची दखल : ऍड. भगत यांचा राज्यस्तरीय सन्मान

अलिबाग : रायगड जिल्ह्यात सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात निःस्वार्थ सेवा देणाऱ्या देवा ग्रुप फाऊंडेशनचे कोकण प्रदेश सचिव ऍड. विश्वनाथ भगत यांच्या कार्याची राज्यपातळीवर दखल घेत, त्यांना ‘महाराष्ट्र रत्न’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार आनंदी युनिव्हर्स फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने पुण्यात आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर सिनेअभिनेत्री फाल्गुनी झेंडे, रंजना सिंग, डॉ. अविनाश सकुंडे, रवी अग्रवाल (अनुर्वी फाऊंडेशन), गणेश विटकर (आनंदी फाऊंडेशन) यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
पेशाने वकील असलेले ऍड. भगत सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रातही सक्रिय आहेत. त्यांनी रायगड जिल्ह्यात विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करत हजारो नागरिकांना वैद्यकीय मार्गदर्शन आणि उपचार दिले आहेत. विशेष म्हणजे, तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने आरोग्यविषयक समस्या सोडवण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत.
त्यांच्या या सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांना ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार देण्यात आला असून, हा गौरव सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायक ठरतोय.