आरोग्य रक्षणाचा ध्यास; पोयनाडमध्ये कर्करोग तपासणी शिबिराला भरघोस प्रतिसाद

पोयनाड : अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथे टाटा मेमोरियल हॉस्पिटल (खोपोली व मुंबई) आणि जेएसडब्ल्यू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान कर्करोग पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हुलासिबाई विविधलक्षी जैन समाज हॉल व विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात झालेल्या या शिबिरात ५०० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेऊन आपली आरोग्य तपासणी करून घेतली.
या शिबिरात कर्करोग प्रतिबंधात्मक उपाय, तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम, स्तनाचा कर्करोग, घसा व फुफ्फुसाचा कर्करोग आदींची प्राथमिक तपासणी करण्यात आली. याशिवाय रोगाविषयी जनजागृती व मार्गदर्शनही करण्यात आले. कर्करोगाविषयी नव्याने विचार करण्याची दृष्टी या उपक्रमामुळे लाभल्याचे मत आरोग्य यंत्रणेमधील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
शिबिरात प्राथमिक लक्षणे आढळलेल्या रुग्णांची पुढील तपासणी टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या शिबिराच्या आयोजनासाठी डॉ. भरती, डॉ. अर्चना, डॉ. मोनिका, डॉ. जान्हवी आणि आरोग्य विभागाचे एमएसडब्ल्यू प्रेमदीप गायकवाड यांच्यासह संपूर्ण टीमने मोलाचे योगदान दिले.
पोयनाड व्यापारी असोसिएशनचे मनोज जैन, मनीष जैन, चंद्रप्रकाश जैन, मनोज टेमकर यांनी शिबिरात सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच जैन मंदिर ट्रस्ट, ग्रुप ग्रामपंचायत पोयनाड व विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट यांनी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांनी त्यांचे आभार मानले.