ताज्या बातम्यामुंबई

नार्वेकर की मुनगंटीवार? अध्यक्षपदाच्या बदलाची चर्चा जोरात


मुबंई : राज्याच्या महायुती सरकारमध्ये लवकरच महत्त्वाचा फेरबदल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रात यासंबंधी एक विशेष बातमी प्रकाशित करण्यात आली आहे. त्यात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर सध्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा सुरू आहे.

या चर्चांवर खुद्द नार्वेकर यांनी प्रतिक्रिया देताना माध्यमातील अहवालांवर फारसा विश्वास नसल्याचं स्पष्ट केलं. “मी फक्त पक्षाच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवतो. आमचं नेतृत्व सध्या दिल्लीत आहे आणि योग्य ठिकाणी आहे,” असं ते म्हणाले.

नार्वेकर यांनाच मंत्रिपदाची अपेक्षा असल्याची चर्चा रंगत असतानाच, त्यांनी अध्यक्षपदाचं महत्त्व अधोरेखित केलं. “विधानसभेचं अध्यक्षपद हे मंत्रिपदापेक्षा वरचं असतं. त्यामुळे जर अध्यक्षपद जावं आणि मंत्रिपद मिळावं, तर त्यात आनंद कसा वाटेल?” असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. मात्र, पक्षाकडून मिळालेली कोणतीही जबाबदारी स्वीकारण्याची तयारी त्यांनी दर्शवली.

“माझं काम कोणत्याही स्वरूपाचं असो – ते अध्यक्षपद असो, मंत्रिपद असो किंवा एक आमदार म्हणून असो – मी ती भूमिका मनापासून पार पाडीन. मला जनतेसाठी काम करायचं आहे,” असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

पक्षाचं नेतृत्वच कोणत्या नेत्याला कोणती जबाबदारी द्यायची हे ठरवतं, असंही ते म्हणाले. “आतापर्यंत मला जी जबाबदारी मिळाली आहे, ती मी प्रामाणिकपणे पार पाडली. विधानसभेच्या कामकाजात गुणवत्ता आणण्याची संधी मला मिळाली. मुंबई आणि नागपूर – दोन्ही ठिकाणी विधान भवनाचा चेहरा बदलता आला, याचं समाधान आहे. सध्या आम्ही विधानसभेचं कामकाज डिजिटल करत असून लवकरच संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस होईल,” असंही नार्वेकर यांनी नमूद केलं.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button