ताज्या बातम्यामहाराष्ट्ररायगड
पुण्यातील ‘सरस्वती’ अलिबागच्या ‘आदर्श’च्या कुशीत! मोठा विलीनीकरण ठराव मंजूर

अलिबाग (प्रतिनिधी) : कोथरूड, पुणे येथील सरस्वती महिला नागरी सहकारी पतसंस्था ही आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये विलीनीकरण करण्याचा महत्वपूर्ण ठराव ‘आदर्श’ पतसंस्थेच्या २७व्या वार्षिक सभेत मंजूर करण्यात आला.
शनिवारी (दि. २ ऑगस्ट) क्षात्रैक्य माळी समाज हॉल, कुरुळ-अलिबाग येथे अध्यक्ष अभिजित सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.
या वेळी पिंपळभाट व पोयनाड शाखांसाठी स्वमालकीच्या जागा खरेदी करण्याचा आणि रामराज शाखेसाठी आधी खरेदी केलेल्या मोकळ्या प्लॉटवर बांधकाम करून शाखेचे कामकाज सुरू करण्याचे ठराव मंजूर करण्यात आले. यासह संस्थेच्या सर्व सभासदांना यावर्षी ११ टक्के लाभांश देण्याचेही जाहीर करण्यात आले.
कल्याण निधीस मदत, निबंध स्पर्धा आणि सत्कार सोहळा
संस्थेच्यावतीने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आणि जिल्हा पोलिस कल्याण निधी, रायगड-अलिबाग यांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.
नाना शंकर शेठ पुण्यतिथीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांमध्ये –
प्रथम क्रमांक: कौस्तुभ म्हात्रे (रेवस शाखा)
द्वितीय क्रमांक: सौ. रेश्मा पाटील (चेंढरे शाखा)
तृतीय क्रमांक: सौ. प्रियांका जगताप-वाळंज (कुरुळ) व श्रीराज पावशे (चोंढी) यांना विभागून देण्यात आले.
या स्पर्धेचे परीक्षण सू. ए. सो. हायस्कूल, कुरुळच्या मुख्याध्यापिका सौ. सुजाता पाटील यांनी केले.
संस्थेचे ज्येष्ठ सभासद श्री. सुभाष विठ्ठल पानसकर सर यांनी वयाच्या ७३व्या वर्षी २३ गड-किल्ल्यांचे ट्रेकिंग केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सभासद प्रशिक्षण व सहकार शिक्षणाची घोषणा
सभेला पूर्वी सहकारी संघ, पुणेचे श्री. एस. बी. वटाणे यांनी उपस्थित सभासदांना कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यावर मार्गदर्शन केले.
संस्थापक श्री. सुरेश पाटील यांनी सहकार आणि बँकिंग क्षेत्रात प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचा मानस व्यक्त केला.
अध्यक्ष अभिजीत पाटील यांचे आर्थिक आढावा सादरीकरण
सभेच्या शेवटी अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी संस्थेची आर्थिक स्थिती सभासदांसमोर मांडली.
यावेळी सुरेश पाटील, कैलास जगे, अनंत म्हात्रे, सतीश प्रधान, ॲड. आत्माराम काटकर, विलाप सरतांडेल, ॲड. रेश्मा पाटील, ॲड. वर्षा शेठ, भगवान वेटकोळी, रामभाऊ गोरीवले, महेश चव्हाण, श्रीकांत ओसवाल, संजय राऊत (सी.ए.), डॉ. मकरंद आठवले आदी संचालक उपस्थित होते.
सूत्रसंचालन: मुख्याधिकारी उमेश पाटील
आभार प्रदर्शन: तज्ज्ञ संचालक डॉ. मकरंद आठवले