ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
बीईसी केमिकल्समध्ये गॅस गळती! एक कामगार आयसीयुत – ‘सुरक्षेचे सर्टिफिकेट’ कागदावरच?

रोहा/अलिबाग : बीईसी केमिकल्समध्ये घडलेल्या गॅस गळतीच्या घटनेनं रोह्यातील औद्योगिक सुरक्षेचा फुगा फुटल्याचं चित्र आहे. एकीकडे कंपनी कागदोपत्री सुरक्षा मानके दाखवत राहते, तर दुसरीकडे रात्री ड्युटी करत असलेल्या कामगाराला गॅस गळतीमुळे आयसीयुत जावं लागतं, ही दुर्दैवाची आणि संतापजनक बाब आहे.
पंकेश रामचंद्र पाटील (३५, न्हावे, रोहा) हे १ ऑगस्ट रोजी नाईट शिफ्टमध्ये काम करत असताना गॅस गळतीमुळे त्रासाला बळी पडले. मळमळ, दम लागणे, खोकला सुरू झाल्यानंतर त्यांनी ड्युटी पूर्ण केली – पण नंतरची घटना धक्कादायक आहे.

रुग्णालयांमधून हलवले, आयसीयुत, पण कंपनी ‘सुरक्षिततेचा’ दावा करत राहिली!
सुरुवातीला रोहा उपजिल्हा रुग्णालय दाखल केले. नंतर अलिबाग जिल्हा रुग्णालयात आयसीयुत प्रकृती खाल्यावल्याने क्रिटिकेअर पनवेल येथे उपचार सुरु आहेत.
ए जी ए रुग्णालयाऐवजी क्रिटिकेअर का? याचं उत्तर कोणीच देत नाही
हे अपघात नव्हे – व्यवस्थेतील त्रुटीचं सर्जिकल सत्य!
ही घटना एखाद्या मशीनच्या चुकीमुळे घडलेली नाही. सतत दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या सुरक्षा उपाययोजनांचा परिणाम आहे. गॅस गळती ही अपघाती नाही – ती व्यवस्थेतील दुर्लक्षाची सजीव साक्ष आहे, असा आरोप कामगार करत आहेत.
कामगारांचा सवाल : आमच्या जीवाची किंमत काय?
कामगारांनी सांगितलं –
“ड्युटीवर असताना त्रास सुरू झाला तरी, कंपनीने वेळेत डॉक्टर, औषध, प्रोटोकॉल लागू केला नाही. एचआर आले, पण फक्त दाखवण्यासाठी. आमचं आयुष्य ‘कॉस्ट कटिंग’मध्ये मोजलं जातंय का?”
प्रशासन झोपेचं सोंग घेणार का? की मोठी दुर्घटना होईपर्यंत वाट पाहणार?
अशी घटना घडूनही औद्योगिक सुरक्षा निरीक्षक, कामगार कल्याण अधिकारी, MIDC प्रशासन कोठे आहेत? की ‘Bec’सारख्या मोठ्या नावांसमोर कारवाई थांबते?
….
दरम्यान,अलिबागच्या जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये पोलिसांनी सदरच्या घटनेचा पंचनामा केला आहे. त्यानुसार पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पावडरची बॅच घेऊन रेक्टर जवळ घेऊन टाकण्यासाठी जात होतो. त्यावेळी प्लांट मधून येणारा वायू नाका तोंडात गेला. नंतर खूप त्रास व्हायला लागला. रमन बलकवडे आणि महेंद्र कदम यांनी माझी विचारपूस केली. मी तशाच अवस्थेत ड्युटी पूर्ण केली आणि घरी गेलो, असे पंकज पाटील यांनी पोलिसांना दिलेला जबाब सांगितले.
……
कंपनीमध्ये अशी घटना घडली आहे. ज्या दिवशी घटना घडली त्यादिवशी संबंधित कामगाराने कंपनीला माहिती दिली नाही. तातडीने आम्हाला माहिती दिली असती तर लगेच उपचार सुरू करता आले असते. कंपनी जखमी कामगाराच्या पाठीशी आहे. क्रिटिकेअर रुग्णालयात चांगले उपचार मिळावेत हा हेतू आहे – गजानन बामणे, वरिष्ठ व्यवस्थापक ( एच आर ) बीईसी केमिकल्स
ठोस मागण्या :
1. बीईसी केमिकल्समधील सुरक्षेची तातडीने फेरचाचणी करून अहवाल जाहीर करा
2. पीडित कामगाराच्या उपचाराचा पूर्ण खर्च कंपनीकडून वसूल केला जावा
3. सुरक्षेच्या नावाने गोंधळ घालणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा
4. औद्योगिक सुरक्षा विभागाने स्वयंस्फूर्तीने तपास सुरू करावा
दरम्यान, बातमीतील कोणताही आरोप हा वैध स्त्रोत, प्रत्यक्षदर्शी व कामगारांच्या माहितीनुसार मांडण्यात आलेला आहे. आमचा उद्देश जबाबदार यंत्रणेला जागं करणं हा आहे, बदनामी नव्हे.
……