ताज्या बातम्यामहाराष्ट्ररायगड

“सरकारने केली ‘लाडकी’ फसवणूक! तरुणांच्या भविष्याशी खेळ… शेकापचा उघड इशारा: आता रस्त्यावर उत्तर मिळेल!”


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
सांगली : “शासनाने फसवले, आता आम्ही रस्त्यावर उतरतो! तरुणांचा आवाज दाबणार नाही, आणि या अन्यायाची किंमत सरकारला चुकवावी लागेल,” असा थेट इशारा शेतकरी कामगार पक्षाच्या अलिबाग तालुका युवक संघटनेचे अध्यक्ष विक्रांत नंदकुमार वार्डे यांनी दिला आहे.
1 ऑगस्ट रोजी सांगलीत झालेलं आंदोलन हा या नाराजीचा उद्रेक होता. तुकाराम बाबा महाराज यांच्या आमरण उपोषणात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले युवक हताश, पण लढण्याच्या निर्धाराने पेटलेले होते.
“मी त्या आंदोलनात सहभागी झालो. युवकांच्या डोळ्यांतील आसवांत, आवाजातली तगमग आणि मनातली पेट – सगळं स्पष्ट जाणवत होतं. हे सामान्य आंदोलन नाही, हा असंतोषाचा स्फोट आहे. सरकारने जर वेळीच तो गांभीर्याने घेतला नाही, तर हा आगीचा वणवा होईल – ज्यात खोटी आश्वासने आणि ढोंगी योजना जळून खाक होतील!, असे विक्रांत वाडे यांनी घणाघात केला.
शेकाप आता केवळ निवेदनं देणार नाही, तर लढणार आहे – रस्त्यावर, सभागृहात आणि विधानमंडळात! वार्डे पुढे म्हणाले, “हे सरकार बेरोजगार तरुणांच्या भविष्यासोबत खेळत आहे. आम्ही गप्प बसणार नाही. ही लढाई सुरू झाली आहे, आणि ती आता थांबणार नाही.”
राज्य सरकारने लाखो युवकांना “लाडका भाऊ योजना” दाखवून गोड स्वप्नं दाखवली. “प्रशिक्षण देतो, पुढे नोकरी देतो,” असे सांगत त्यांना कमी मानधनात कामाला जुंपले. पण आता, जबाबदारी घेण्याऐवजी सरकार हात झटकते आहे.
हा केवळ विश्वासघात नाही – ही सरळसरळ फसवणूक आहे!
वर्षानुवर्षे रिक्त असलेल्या पदांवर प्रशिक्षित आणि पात्र उमेदवारांची नेमणूक करण्याऐवजी, सरकार त्याच निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा अर्ध्या पगारावर नेमते आहे – पेन्शनही सुरू, पगारही सुरू… आणि युवकांच्या वाट्याला उपेक्षा, अपमान आणि बेरोजगारी!
आज या युवकांकडे ना नोकरी आहे, ना त्यांचे प्रशिक्षण उपयोगी ठरतेय, ना त्यांचे प्रमाणपत्र वैध ठरवले जाते. शासनाने त्यांचा वेळ, श्रम, आणि भविष्य शोषून घेतलं आणि आता ‘घरी बसा’ म्हणत त्यांना गडगडून सोडून दिलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button