ताज्या बातम्यामहाराष्ट्र

जल जीवन मिशनसाठी ६१ हजार कोटींची तरतूद; कामांच्या गुणवत्तेसाठी थर्ड पार्टी ऑडिट सक्तीचे


मुबंई : राज्यात जल जीवन मिशन अंतर्गत आतापर्यंत एकूण ५१,५५८ योजना मंजूर करण्यात आल्या असून, त्यापैकी २५,५४९ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित योजनांची कामे प्रगतीपथावर असून ती लवकरात लवकर पूर्ण केली जातील, असे पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य डॉ. प्रज्ञा सातव यांनी या विषयावर प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, “राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचविणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या व्यापक योजनांसाठी अंदाजे ६१ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, आतापर्यंत राज्य शासनाने २४८३.५८ कोटी रुपये निधी वितरित केला आहे.”

केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाकडे वेळोवेळी निधी उपलब्धतेसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच या योजनांची गुणवत्ता आणि पारदर्शकता टिकवण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिट केल्याशिवाय कोणतेही देयक अदा केले जात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button