ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

८५१ लोकांचं गाव, पाच कोटींचा पुरस्कार; आडाचीवाडीने आधी ‘गाव जिंकण्याचा’ फॉर्म्युला शोधला!

विकासकामांपेक्षा लोकसहभागाला दिली ताकद; रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या दूरदृष्टीला ग्रामस्थांची साथ, छोट्याशा गावाचा ग्रामविकासाचा पॅटर्न राज्यात अव्वल


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

पुणे / नाशिक |

एखाद्या गावाने राज्यात पहिला क्रमांक पटकावला की पुरस्काराची रक्कम चर्चेत येते; पण त्या पुरस्कारापूर्वी गावाने स्वतःला कसं बदललं, हीच खरी कहाणी असते. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील अवघ्या ८५१ लोकसंख्येच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीने राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात’ राज्यात प्रथम क्रमांक पटकावत ५ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे. मात्र आडाचीवाडीची गोष्ट पाच कोटींपासून सुरू होत नाही; गाव जिंकण्याची पद्धत शोधण्यापासून ती सुरू होते.

या यशामागे आडाचीवाडीचा एक महत्त्वाचा ‘सुपुत्र’ आहे रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के. प्रशासकीय सेवेत मोठ्या जबाबदारीच्या पदावर पोहोचूनही आपल्या गावाशी असलेली नाळ त्यांनी कायम ठेवली. प्रशासनाचा अनुभव, योजनांची जाण आणि विकासाकडे पाहण्याची व्यापक दृष्टी गावाच्या कामी लागली. सरकारकडून काय मिळेल याची वाट पाहण्यापेक्षा गावाने स्वतःच्या ताकदीवर काय उभं करावं, याला दिशा देण्यात शिर्के यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.

मात्र ही केवळ एका व्यक्तीची कहाणी नाही. शिर्के यांनी दिशा दाखवली आणि ग्रामस्थांनी ती प्रत्यक्षात उतरवली. लोकसहभागाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून गावकऱ्यांनी स्वतःच्या गावाच्या परिवर्तनात सहभाग घेतला. त्यामुळे आडाचीवाडीचा पहिला क्रमांक हा एका ग्रामपंचायतीच्या कामगिरीपेक्षा गावच्या सुपुत्राची प्रशासनिक दृष्टी आणि ग्रामस्थांची सामूहिक इच्छाशक्ती यांचा संगम ठरला आहे.
१५ पाणंद रस्ते; ‘सरकार करेल’ची वाट न पाहता गाव स्वतः रस्त्यावर!

आडाचीवाडीने लोकसहभागातून सर्व १५ पाणंद रस्ते खुले केले. महाराष्ट्रात लोकसहभागातून गावातील सर्व पाणंद रस्ते खुले करणारे हे पहिले गाव ठरल्याचा मानही आडाचीवाडीने मिळवला आहे. इथेच या गावाचा विकासाचा फॉर्म्युला दिसतो. निधीची वाट पाहत बसण्यापेक्षा ग्रामस्थांना सोबत घेऊन उपलब्ध साधनांचा वापर करायचा आणि गावाचा प्रश्न गावानेच सोडवायचा. या विचारातून पाणंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला.

आडाचीवाडीने विकासाची व्याख्या केवळ रस्ते आणि पाणीपुरवठ्यापुरती मर्यादित ठेवली नाही. गावात डिजिटल शाळा, वातानुकूलित जिम आणि वॉटर एटीएम अशा आधुनिक सुविधा उभ्या करण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची साधने मिळावीत, नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात आणि स्वच्छ पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या सुविधा विकसित करण्यात आल्या.

आडाचीवाडीचा सर्वात वेगळा पैलू म्हणजे गुगल मॅपवर कचराकुंडीचे स्पॉट्स नोंदवण्याचा प्रयोग. कचरा व्यवस्थापनासारख्या स्थानिक प्रश्नालाही डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली. याहूनही वेगळा प्रयोग म्हणजे स्मशानभूमीत ग्रंथालय. मृत्यूची जाणीव करून देणाऱ्या जागेत ज्ञानाचं दालन उभं करून आडाचीवाडीने सामाजिक विचारांची नवी दिशा दाखवली आहे.

लोकसहभागातून पाणंद रस्ते, डिजिटल शिक्षण, आरोग्य व फिटनेस सुविधा, पाणी व्यवस्थापन, स्वच्छता आणि डिजिटल कचरा व्यवस्थापन अशा विविध प्रयोगांची सांगड घालत आडाचीवाडीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
याच कारणामुळे ५ कोटींचा पुरस्कार हा या गावाच्या प्रवासाचा शेवट नसून त्याच्या कामाची राज्य सरकारने केलेली पावती आहे. आडाचीवाडीने ‘मॉडेल व्हिलेज’ ही संकल्पना केवळ कागदावर न ठेवता ती प्रत्यक्षात उतरवली.
आडाचीवाडीची कथा म्हणूनच वेगळी आहे. गावचा एक मुलगा प्रशासनात मोठ्या पदावर पोहोचला; त्याने प्रशासनाचा अनुभव आपल्या गावासाठी वापरला; ग्रामस्थांनी त्याला साथ दिली आणि एका छोट्याशा गावाने संपूर्ण राज्याला विकासाचा नवा पॅटर्न दाखवून दिला.
म्हणूनच आडाचीवाडीने पाच कोटी जिंकले नाहीत; आधी गाव जिंकण्याची पद्धत तयार केली आणि त्यानंतर पाच कोटींचा पुरस्कार गावाच्या दारात आला! ८५१ लोकांचं गाव राज्यात पहिलं आलं; कारण गावाची लोकसंख्या छोटी होती, पण गावाचं स्वप्न मोठं होतं.

……


Related Articles

Back to top button