ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

२६ जानेवारी २०२६ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा गौरव — केंद्रीय सहकार संचालक पंकज श्रीवास्तव 


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
रायगड : २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा गौरव होणार असल्याची ऐतिहासिक घोषणा केंद्रीय सहकार मंत्रालयाचे संचालक पंकज श्रीवास्तव यांनी गुरुवारी रायगड भेटीदरम्यान केली. देशातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी बँकांमध्ये अग्रस्थान पटकावत रायगड बँकेने महाराष्ट्रासाठी अभिमानाची नवी पर्व सुरुवात केली आहे.
केंद्रीय संचालकांची बँकेला भेट – कामगिरीचा सविस्तर आढावा
केंद्र सरकारच्या अभिनव सहकार उपक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या संस्थांच्या पाहणी दौर्‍याचा एक भाग म्हणून केंद्रीय सहकार मंत्रालयाचे संचालक पंकज श्रीवास्तव यांनी गुरुवारी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट दिली. बँकेच्या विविध विभागांचे काम, केंद्र आणि नाबार्ड पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी, डिजिटलायझेशन, कर्जवाटप आणि वसुली कामकाजाचा त्यांनी तपशीलवार आढावा घेतला. रायगड भेटीआधी त्यांनी तामिळनाडू राज्यातील सहकारी बँकांचा दौरा केला होता.
रायगड — देशातील ‘आदर्श सहकार मॉडेल’
श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले की,
“नाबार्ड, जिल्हा उपनिबंधक कार्यालय आणि जिल्हा बँक यांची सुसंगत, वेगवान आणि परिणामकारक कार्यपद्धती देशात दुर्मिळ आहे. रायगड हे महाराष्ट्रातील आदर्श सहकार मॉडेल बनले आहे.” रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नाबार्ड आणि केंद्र शासनाच्या अनेक पायलट योजना यशस्वीपणे राबवून राष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख मजबूत केली आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी रायगड बँक अग्रस्थानी
केंद्र शासनाचे उद्दिष्ट सहकारी संस्थांना सक्षम बनविणे हे असून ग्रामीण भागात स्वयंरोजगार, उद्योगविकास, वित्तीय साक्षरता या क्षेत्रांना गती देण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांना रायगड जिल्हा बँकेने दिलेला प्रतिसाद आणि कार्यक्षमता आदर्शवत असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.
बँकेला आवश्यक असलेले तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य केंद्र शासनाकडून देण्यात येईल, असेही त्यांनी आश्वासन दिले.
मान्यवरांची उपस्थिती – योजनांचा आढावा
या भेटीदरम्यान नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप आपसुंदे, पुणे उपनिबंधक प्रकाश जगताप, रायगड उपनिबंधक प्रमोद जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, विभागीय अधिकारी संदेश पाटील, कर्ज वसुली प्रमुख डी.एम. जाधव खालापूर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन निलेश घोसाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नाबार्डचे प्रदीप आपसुंदे यांनी नाबार्डच्या प्रकल्पांची माहिती सादर केली. सीईओ मंदार वर्तक यांनी स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
 दरम्यान, बँकेच्या संगणकीकरणातील उत्कृष्ट कार्याबद्दल योगेश पाटील आणि नेहा पाटील यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचा शेवट – कौतुक आणि आभार
आदर्श सहकार रचना उभारण्यासाठी सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि सभासदांनी दाखविलेल्या समन्वयाबद्दल श्रीवास्तव यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागीय अधिकारी संदेश पाटील यांनी केले.
केंद्रीय सहकार संचालक म्हणजे कोण?
केंद्रीय सहकार संचालक हे केंद्र सरकारच्या Ministry of Cooperation मधील वरिष्ठ अधिकारी असून ते थेट सहकार सचिव आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना रिपोर्ट करतात. देशातील सहकारी संस्था व सहकारी बँकांच्या धोरणांची अंमलबजावणी, मार्गदर्शन, निरीक्षण आणि प्रगतीचा आढावा ही त्यांची प्रमुख जबाबदारी असते.
……

Related Articles

Back to top button